दिनांक ७, ८, १४ आणि १५ ऑक्टोबर २०२४ या चार दिवशी विविध सांगितिक कार्यक्रमांची मेजवानी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत, संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने ‘संगीत सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक ७ ऑक्टोबर; मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर; सोमवार दिनांक १४ ऑक्टोबर आणि मंगळवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ असे चार दिवस सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत विविध सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले (पूर्व) स्थित मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात होणाऱ्या या ‘संगीत सप्ताह’साठी रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य असणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत, संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. गत ३५ वर्षांपासून संगीत विभागातर्फे ‘संगीत सप्ताह’चे आयोजन करण्यात येते. यंदा या ‘संगीत सप्ताह’चे ३६ वे वर्ष आहे.
संगीत सप्ताहाचा शुभारंभ सोमवार, दिनांक ७ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होईल. गंधर्व महाविद्यालयाचे कुलसचिव श्री. विश्वास जाधव हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे असतील. तर उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचा गायन, नृत्य आणि नाट्याचा ‘शिवराज्य’ हा शतरंगी कार्यक्रम होईल. दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पूजा पंत अकादमीच्या वतीने ‘रागरागिणी’ हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम सादर होईल. दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महानगरपालिका शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच लोककवी श्री. प्रशांत मोरे यांच्या दीर्घ कवितेवर आधारित व अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित नाट्याविष्कार ‘वेदना सातारकर? हजर सर!!’ सादर केला जाईल. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या गाण्यांवर आधारित 'आठ अक्षरं' हा कार्यक्रम संगीत शिक्षक कलाकार सादर करतील. याच दिवशी दुपारी २ वाजता संगीत सप्ताहाचा समारोप होईल. संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या चौरंग संस्थेचे संचालक श्री. अशोक हांडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर आदी मान्यवर समारोप सोहळ्यास उपस्थित असतील.महानगरपालिकेचे संगीत शिक्षक यांच्यासह प्रथित यश कलाकारदेखील या सप्ताहातील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतील. संगीत विभागाच्या प्राचार्या श्रीमती शिवांगी दामले व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी या सप्ताहाचे संयोजन केले आहे.संगीत सप्ताहातील सर्व कार्यक्रमांसाठी रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य आहे. या संगीत सप्ताहास रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले आहे.
0 टिप्पण्या