विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांवर सोयीसुविधा पुरविणाऱ्या कंत्राटादारांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १७ ऑक्टोबर २०२४) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित किमान सुविधा योग्यप्रकारे पुरविल्या जाव्यात. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सोयीसुविधा देण्यात कोणतीही कसूर ठेवू नये, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले. तसेच मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची पूर्तता, गुणवत्ता आदींचे परीक्षण करण्यासाठी पाचसदस्यीय पथक कार्यरत राहील, अशी माहितीही त्यांनी दिली. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार, सर्व परिमंडळांचे उप आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीवेळी काही मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधांबाबत मतदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची माननीय भारत निवडणूक आयोग तसेच माननीय राज्य निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यांमधील प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे आदी निश्चित किमान सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे. या सोयीसुविधांच्या अभावामुळे मुंबईची प्रतिमा डागाळली जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यात येत आहे. तथापि, या सुव्यवस्थित आणि उत्तम गुणवत्तेच्या निश्चित किमान सुविधा योग्यप्रकारे पुरविण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदारांचीही आहे. निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे कंत्राटदारांनी केवळ व्यावसायिक विचार न करता या राष्ट्रीय कार्यात आपले उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहनही श्री. गगराणी यांनी यावेळी केले.
दरम्यान, निवडणूक यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्यात निश्चित किमान सुविधांच्या पूर्ततेसाठी योग्य समन्वय राहावा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व परिमंडळीय उप आयुक्त यांचे सहकार्य राहील. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा तयार असल्याची पाहणी उप आयुक्त करतील. तसेच मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पूर्तता आणि गुणवत्ता तपासण्यासाठी ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, घनकचरा व्यवस्थापन, परिरक्षण आदींशी संबंधित वरिष्ठ स्तरावरील पाच अभियंत्यांचा समावेश असलेले पथक नेमण्यात आले आहे, असेही गगराणी यांनी यावेळी सांगितले
दरम्यान मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निष्कासन कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन विभागाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत (दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२४) संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मिळून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे आदी निष्कासित केले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा) विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठेही अनधिकृतपणे फलक आणि बॅनर्स लावू नयेत. ज्याठिकाणी अनुज्ञेय आहे, त्याठिकाणी विहित परवानगी प्राप्त करून त्यानंतरच जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रदर्शित करता येतील, असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करून व अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी प्रदर्शित केल्याचे आढळल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात ठेवून सातत्याने अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स इत्यादी प्रचार साहित्यावर निष्कासन कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४८ तासांत (दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२४) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भित्तीपत्रके (९४२), फलक (८१७), कटआऊट होर्डिंग (५९६), बॅनर्स (३७०३), झेंडे (१३३१) आदी मिळून एकत्रितपणे ७ हजार ३८९ साहित्य अनुज्ञापन खात्याने निष्कासित केले आहे. अनुज्ञापन खात्याच्या चमुमार्फत महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये सातत्याने अशा पद्धतीचे साहित्य निष्कासन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना उपायुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव यांनी दिल्या आहेत. Cvigil App या एपच्या मदतीनेही मतदारांना आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करण्याची सुविधा भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. या एपवर केलेल्या तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांत केले जाते. त्याशिवाय मतदारांना १९५० या हेल्पलाईन क्रमांकाचाही पर्याय पुरविण्यात आला आहे.
0 टिप्पण्या