बदलापूर नंतर आता ठाण्यात देखील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. सचिन यादव (५०) याने ठाण्याच्या भंडार आळीमध्ये ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मात्र वेळीच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी अटक केलेला यादव याला 24 तासाच्या आतच जामीन मिळाला. सदर यादव हा ठाण्यातील एका माजी नगरसेवकाचा पी.ए.असल्याची माहिती मिळत आहे. आणि या माजी नगरसेवकावर ठाण्यातील बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याने या प्रकरणी काहीही होणार नाही अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे. म्हणूनच पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद असतानाही जामिन दिल्यामुळे ठाणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सचिन यादव याची जामीनावर सुटका झाल्याने याच्या निषेधार्थ रविवारी भंडार आळीत भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी आक्रोश करीत थेट ठाणेनगर पोलीस ठाण्यात पोचल्या. आरोपीला पॉक्सो कलम लावल्या नंतरही न्यायालयातून जमीन मंजूर कसा झाला याबाबत पोलीस ठाण्यात जाब विचारण्यात आला. यावेळी महिलांनी नराधमावर कडक कारवाईची मागणी केली. या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी रविवारी आक्रोश केला. भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, नम्रता कोळी आणि भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी नराधमावर कडक कारवाई करावी आणि त्यासोबतच ठाण्यात अशा अपप्रवृत्ती वाढलेल्या आहेत आणि घटनाही वाढल्या आहेत त्या वेळीच ठेचाव्या अशी मागणी पोलिसांकडे केली. मात्र ठाण्यातील बड्या नेत्याचा वरदहस्त असलेल्या माजी नगरसेवकाचा हा पी.ए असल्यानेच त्याला मोकळीक देण्यात आली असल्याची चर्चा यावेळी रंगली होती.
ठाणे येथील नऊ वर्षांच्या चिमुरड्या मुलीबरोबर गैरकृत्य करणाऱ्या आरोपी सचिन यादव याच्यावर पोक्सो अंतर्गत कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर जिल्हाध्याक्ष संजय वाघुले ,भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी, माजी नगरसेवक सुनील हंडोरे यांच्यासह नागरिकांनी ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार देशमुख यांची भेट घेतली. आरोपी नराधम सचिन यादव याला जामीन मिळाला असून, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अपील करण्याची मागणी केली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, नौपाडा मंडळ युवा मोर्चाच्या अध्यक्ष राहुल कुंड,, नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, प्रभाग अध्यक्ष प्रतिक सोलंकी, अन्वेश जयगडकर, शुभम गुप्ता, नितेश तेली, रश्मी मोरे, मीनाक्षी मिस्त्री, अरुणा कांबळे, निखत सारंग, अंजली भालेराव, सुनीता भोईर, यांच्यासह मोठ्या संखेने स्थानिक महिलांची उपस्थित होत्या त्यांनी प्रचंड आक्रोश केला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडताहेत. याबाबतच महिलांचा आक्रोश आहे कारवाई कठोर झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी दिली. तर अशा घटना वाढत आहेत. आरोपीना दिलासा मिळत कामा नये, राजकीय वरदहस्त असला तरीही शिक्षा व्ह्यालाच पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी व्यक्त केली. या प्रकरणात हयगय चालणार नाही. जर आरोपीच्या मागे राजकीय वरदहस्त असल्यास भाजप महिला मोर्चा तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा भाजपा महारष्ट्र प्रवक्ता, महाराष्ट्र महिला सचिव आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिला.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आंदोलन
महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामध्ये पुणे व ठाणे जिल्हा या ठिकाणी वारंवार एका मागून एक अशा घटना घडत आहेत. नुकताच बदलापूर येथे अक्षय शिंदे या आरोपीकडून चिमुकल्या मुलीवर केलेल्या अत्याचाराचा संपूर्ण देशाने निषेध केला आहे. अशी ताजी घटना घडलेली असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात त्यांच्याच पक्षातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने भंडारआळी येथील ११ वर्षाच्या चिमूरड्या मुलीवर विनयभंग केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. अशा आरोपीला जामीन कसा मंजूर होऊ शकतो यावर प्रश्नचिन्ह पडले असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आज ठाणे नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये या आरोपीला सोडण्यासाठी जर राजकीय हस्तक्षेप होत असेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे. तसेच या आरोपीवर पोक्सो अंतर्गत अधिकाधिक कठोर गुन्हा दाखल करून त्याला पुन्हा अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यावेळी महिला जिल्हा संघटक रेखाताई खोपकर, समिधा मोहिते, आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, मंजिरी ढमाले, संगीता साळवी, कांता पाटील, सुप्रिया गावकर, सुनंदा देशपांडे ,नंदा कडकोळ, रजनी बंका, हेमांगी पांचाळ, सचिन चव्हाण, संजय भोई, राकेश जाधव, आनंद मानकामे, वरून मानकामे, अजय पवार, बिपिन गेहलोत तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या