छ.संभाजीनगर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जवळील बौद्धलेण्या. पुष्पगुम्फा अथवा औरंगाबाद बौद्धलेण्या या नावानेही त्या ओळखल्या जातात. सुमारे अडीच हजार वर्षांचा ज्या लेण्यांचा सांस्कृतिक इतिहास आहे, ह्या लेण्या अतिक्रमित असल्याचा जावईशोध लावून पोलिसांमार्फत बौद्धलेण्यांनाच विना तारखेची एक नोटीस बजावण्यात आली. बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पो. नि. मंगेश जगताप यांनी नोटीशीत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत BNSS कलम १६८ प्रमाणे अधिकाराचा वापर करीत म्हटले आहे, की सदरील जागेवर अतिक्रमण केलेले असून स्वत: हून काढून घ्यावे, नसता महानगर पालिकेस ते बळजबरीने निष्कासित करावे लागेल. संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या सहीनिशी लेण्यांवर नोटीस चिकटवली. बरे, सदरील जमीन महानगर पालिकेच्या हद्दीत आहे काय? तर नाही. ती वनखात्याच्या अखत्यारीत असल्याचे समजते. मग महानगर पालिका कोणत्या आधारे यात सहभाग घेणार आहे? महानगर पालिकेस यात नाक खुपसण्याचा काय अधिकार आहे? पोलीस खात्यास हे माहीत नाही काय? नेमके याच वेळेला पोलीस हे प्रकरण का उकरून काढत आहेत? याचे उत्तर कुणाकडेच नाही.
महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर अनेक बौद्ध विहाराचे रूपांतर मंदिरात आणि तथागत भ. बुध्दांच्या मूर्तीचे रूपांतर देव - देवतामध्ये करून अनेक ठिकाणी आजही पूजा - अर्चा करण्यात येत आहे, हे शासनास दिसत नाही काय? शासन बहिरे आहे, हे ऐकले होते. सामान्यांच्या व्यथा, वेदना त्याला ऐकू येत नाहीत, अशी वदंता होती. आता तर ते आंधळेही झाले असल्याचे दिसून येते. या देशात प्रतिक्रांती करणाऱ्या विचारांची माणसे सत्तेत बसल्यावर काय काय पहावयास मिळते, त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. प्रतिगाम्यांचे प्रतिनिधी संसदेत असल्याने त्यांचेकडून आणखी काय अपेक्षा करणार? छ .संभाजीनगर येथील बौद्धलेणी बचावसाठी बौद्ध समाज एकवटला. समस्त बौद्धजनांचा जनसैलाब आणि आक्रमक पवित्रा बघता नजरचुकीने नोटीस बजावण्यात आली, अशी पोलिसांतर्फे आता सारवासारव करण्यात येत आहे. मात्र, नजरचुकीेची ही चूक करणाऱ्या पोलीस निरीक्षकास आणि त्याच्या कर्त्याकरवित्यास, बोलवित्या धन्यास कायद्यांत काहीतरी शिक्षेची तरतूद असेलच ना! ती शिक्षा कधी होणार? चुकीला माफी नाही, या न्यायाने त्यांना निलंबित केले पाहिजे. त्यांचेवर खटला दाखल केला पाहिजे. म्हणजे भविष्यात आपल्या पदाचा गैरवापर करण्याची हिंमत कोणीही अधिकारी करणार नाही.
अर्थात, विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करीत आपली पोळी भाजून घेण्याकरिता रचलेले हे कारस्थान आहे, हे आता सर्व जनतेस कळून चुकले आहे. देशभरात बौद्ध भिक्खूंची निवासस्थाने हजारो वर्षांपासून लेण्यांजवळच असल्याचे पुरावे मिळतात. बौद्ध धम्माचा सांस्कृतिक इतिहास अभ्यासल्यास हे स्पष्टपणे जाणवते. गेल्या सहा - सात दशकांपासून विद्यापीठ जवळील बौद्ध लेण्यांजवळ भिक्खूंचे वास्तव्य आहे. मग आत्ताच भिक्खूंचे लेण्यांजवळील वास्तव्य यांच्या डोळ्यात का खुपते आहे? की या प्रकरणाच्या आडून काही मंडळींना राजकारण करायचे आहे? की त्या जमिनीवर काहींचा डोळा आहे? उपासक बौद्धजन आणि बौद्ध भिक्खू तथागतांच्या प्रज्ञा, शील, करूणेचे तंतोतंत पालन करणारे आहेत. शांती - अहिंसेचे भोक्ते आहेत. असे असले तरीही शासनाने त्यांचा अंत पाहू नये. उगीच त्यांच्या वाटेला जाऊ नये, देशभरातील सर्व लेण्यास तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, त्याच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा. नसता लोकशाही मार्गाने मनुवाद्यांना कसा धडा शिकवायचा, ते त्यांना चांगले ठाऊक आहे.
- प्रा. शिवाजी वाठोरे
(लेखक ख्यातकीर्त साहित्यिक व सामाजिक चळवळीचे अभ्यासक आहेत.)
0 टिप्पण्या