Top Post Ad

धारावी पुनर्वसन प्रकल्प.... केवळ धारावीचा विनाश

धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई विकण्याचा सपाटा सुरुच आहे. मुंबईचा पर्यावरणीय समतोल रहावा यासाठी काँग्रेस सरकारने मुंबईत ना विकास क्षेत्र (NDZ ) निश्चित केली होती त्यातील मढ आयलंडची जमिनही भाजपा सरकारने अदानीला देण्याचा घाट घातला आहे. मढ आयलंड व्यतिरीक्त बोरिवलीतील भूखंडही देऊन भाजपा सरकारने अदानीला दसरा दिवाळीची भेट दिली आहे, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना गायकवाड म्हणाल्या की, मुंबईला लुटण्याचा सपाटा सुरुच असून आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईला जेवढे लुटता येईल तेवढे लुटून मोदानीच्या पदारात टाकण्याचे काम सुरु आहे. मोदानी विकास प्रकल्पाला आणखी एक जमीन भेट देऊन शिंदे सरकारने मोदी-शाह या मालकांच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. आम्ही धारावी हा पुनर्वसन प्रकल्प आहे हे मानतच नाही,हा केवळ अदानीचा विकास आणि धारावीचा विनाश आहे. धारावी प्रकल्पासाठी आणखी किती जमीन हवी आहे?  ५५० एकर धारावीसाठी अख्खी मुंबई अदानीला देऊन टाकणार का? असे सवाल वर्षा गायकवाड यांनी केले आहेत. भाजपा शिंदे सरकारने अडीच वर्षात मुंबईचा स्वाभिमान गुजरातला गहाण ठेवला आहे. मुंबईच्या जमिनी अदानीच्या घशात घालून मुंबईकरांवर अन्याय करण्याचे पाप भाजपा शिंदे सरकार करत आहे. 

धारावीत कोणीही अपात्र रहिवासी नाहीत, धारावीचे सर्व रहिवासी पात्र आहेत आणि सर्वांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत अशी धारावीकरांची मागणी असताना सरकार मात्र पात्र अपात्रतेचा घोळ घालत आहेत. अपात्र झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मालाड-अक्सा-मालवणी भागातील १४० एकर जमीन घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन अदानी कंपनी आणि राज्य सरकारच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकारणास दिली आहे. सुमारे साडे तीन लाख अपात्र धारावीकरांना या जमिनीवर भाडेतत्वावरील घरे देण्याचा सरकारने घाट घातला आहे. अपात्र रहिवाशांना घरे देण्याचा हा सगळा घोळ म्हणजे या सरकारच्या खास मित्राला फायदा मिळवून देण्यासाठी जमीन बळकावण्याचे षडयंत्र आहे. धारावीकरांचा तीव्र विरोध असतानाही भाजपा शिंदे सरकार अदानीसाठी काम करून मुंबईकरांवर अन्याय करत आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला असून हा लढा सुरुच राहणार आहे. धारावीकर व मुंबईकर हा अन्याय सहन करणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपा शिंदे शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवावे, असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com