विद्यापीठाने स्वतःची ओळख करायची म्हणजे काय करायचे ? कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न साकार करण्याचे काम केले तरच विद्यापीठाची खरी ओळख होईल. समाजातील वंचित बहुजनांचे प्रश्न सोडवायला मदत करण्याचे काम विद्यापीठाने करायला हवे. त्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून व्हावी या विद्यापीठात सामजिक स्तर उंचावण्याचे संशोधन करायला हवे .नंदुरबार हा अतिशय वंचित जिल्हा आहे..त्यानंतर सातारा हा वंचित जिल्हा असून आपण सातारा जिल्ह्यातील वंचितता कमी करण्यासाठी काम करावे लागेल. विद्यापीठाने ही वंचितता कुठे आणि कशी आहे हे शोधून आपण वंचितता कमी होत जाण्यासाठी नियोजन केले पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,बहुजन,वंचिताचे व्हायला हवे आहे.वंचिताना मायेची पाखर देणारे व्हावे’ असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांनी व्यक्त केले. ते यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या तृतीय वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
या वेळी विद्यमान कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के ,रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील,विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय कुंभार,रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे , अग्रणी कॉलेज यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. बी.टी.जाधव, डी.जी.कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.के सावंत, विद्यापीठाचे विविध विभागाचे अधिष्ठाता,डॉ.अनिलकुमार वावरे,डॉ.आर.आर.साळुंखे,डॉ.डी.डी.नामदास,प्राचार्य डॉ.मोहन राजमाने,प्राचार्य डॉ.एल.डी.कदम, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले, विद्यापीठाचे विविध विभागाचे संचालक,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठातील मागील कामाचा संदर्भ देताना कुलगुरू डॉ.शिर्के पुढे म्हणाले की‘ आज विद्यापीठाचा तृतीय वर्धापन दिन आनंदाने साजरा होत आहे. कर्मवीर विद्यापीठाची जी घौडदौड चालू आहे त्यास मी शुभेच्छा देतो. माझ्याकडे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची जबाबदारी होती त्यावेळी मी मुंबई,शिवाजी आणि आपल्या विद्यापीठाचा कुलगुरू होतो.या विद्यापीठात काम करणारे जे अधिकारी असतील त्यांनी महाविद्यालयाची जबाबदारी सांभाळून हे विद्यापीठ उभारण्यासाठी सहयोग दिलेला आहे. हे विद्यापीठ वेगळे विद्यापीठ आहे. पहिल्यांदा तीन क्लस्टर विद्यापीठ म्हराष्ट्र्रात आली त्यात मुंबईत दोन विद्यापीठे होती. आणि ग्रामीण भागातील हे पहिलेच विद्यापीठ असल्याने साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष याकडे आहे. भाषणाच्या शेवटी डॉ.शिर्के म्हणाले ‘ विनायक होगाडे यांच्या ‘डियर तुकोबा’ नावाच्या कवितासंग्रहात संत तुकाराम यांना राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी भेटतात या कल्पनेवर कविता लिहिली आहे. ‘तुकोबा कर्मवीर भेट ‘या शीर्षकाची कविता त्यांनी वाचून दाखवली. तुकाराम .महाराज कर्मवीरांना पांडुरंग म्हणतात ‘रयत शिक्षण, कर्म मोठे किती, पेटविल्या ज्योती शिक्षणाच्या’. आख्या भारताला कर्मवीरांनी सर्वात सुंदर भेट दिली असेल तर ती कमवा आणि शिका योजना आहे. जोतिबाचा मार्ग धरून पुढे जाण्याचा मार्ग दिला आहे. तुकाराम आणि आवली म्हणजे जोतीराव आणि सावित्रीबाई आहेत ...कर्मवीरांच्या नावाचे हे विद्यापीठ आहे. संत तुकारामाचा तसेच सर्वांचाच आशीर्वाद हा विद्यापीठाला आहे. मला या विद्यापीठाला प्रथम कुलगुरू होण्याचे सौभाग्य मिळाले त्या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील म्हणाले ‘ विद्यापीठ हे अण्णांचे स्वप्न होते. १९३६ साली त्यांनी स्वप्न बघितले होते. महात्मा गांधीनी वर्ध्यास नयी तालीम योजना सुरु केली होती. ग्रामीण शिक्षण कसे असावे याचे त्यात मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांच्या नावाने विद्यापीठ काढण्याचे स्वप्न होते. १२ फेब्रुवारी १९४८ ला अजिंक्यतारा येथे हे विद्यापीठ काढावे ही इच्छा होती. अण्णांनी यशवंतराव चव्हाण व शहाजीराजे यांना त्यांनी शेवटी देखील पत्र लिहिले होते. १४ मे १९५९ ला सी.डी.देशमुख येणार होते त्यावेळी विद्यापीठ कसे निर्माण करायचे हे ठरणार होते.. पण कर्मवीर यांचे निधन झाले..नियतीने ती जबाबदारी आमच्यावर टाकली. अण्णांचे विद्यापीठाचे स्वप्न साकार करता येईल का? हा प्रश्न होता. आम्हाला जावडेकर यांनी या विद्यापीठासाठी मान्यता दिली. विद्यापीठ निर्माण करण्याचे धाडस आम्ही केले आहे. डॉ.शिर्के सर यांची आम्हाला प्रचंड साथ मिळाली. ५५ कोटीची आशा होती ते मिळाले नाहीत ते हक्काचे आहेत.. सोन्याचा चमचा घेऊन निर्माण झालेले विद्यापीठ आहे. ९००० मुले शिकतात. यु,जी.आणि पी.जी.चे अनेक विभाग आहेत. विद्यापीठाचा विस्तार व्हावा असे आम्हाला वाटत होते. सगळ्या संस्था एकत्र येऊन काम झाले असते तर अधिक चांगले झाले असते. प्रचंड मोठी स्पर्धा आज शिक्षण क्षेत्रात आहे. वेगळी शिक्षण पद्धती उभी करायला पाहिजे . कस्तुरीरंजन यांनी वेगळी शिक्षण पद्धती दिली आहे . खरे तर आज आपला कमकुवतपणा आपणच शोधला पाहिजे .
ज्याची गरज आहे ,ते शिक्षण तुम्हाला देता आले पाहिजे. आज शाळातून विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यापुढे मुले वाढणार नाहीत . असलेल्या मुलांचे भवितव्य काय ? पुढच्या काळात कोणते जॉब असतील ? या विद्यापीठाने २५ वर्षात पुढे काय घडेल याचा अभ्यास करून नियोजन केले पाहिजे.आता दर पाच वर्षात ज्ञान आउटडेटेड होईल. अलीकडच्या काळात प्राध्यापकांची गरज काय ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी काळानुसार सतत कौशल्य आत्मसात करायला हवीत.प्राध्यापकांचा रोल मोठा आहे. विद्यापीठाला पैशाची अडचण पडणार नाही. शिक्षणात अनेक उद्योगपती उतरले आहेत. त्यांनी विद्यापीठ काढली आहेत. रयत सेवकाच्या जीवावर आम्ही आव्हाने स्वीकारलेली आहेत. बदलते शिक्षण आत्मसात करणे हे आव्हान स्वीकारले आहे. आमचे मनुष्यबळ हीच आमची शक्ती आहे. आमचे कल्चर वेगळे आहे. १९९२ ला मुंबईत दंगा झाला ,पण बी.डी.डी चाळीत दंगा झाला नाही... याचा शोध घेतला तेंव्हा असे जाणवले की तिथे रयत शिक्षण संस्थेत शिकलेली सातारा कडील माणसे तिथे राहत होती.शांतता होती. हेच रयत कल्चर आहे.. बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम विद्यापीठाने केले पाहिजे. तुम्हाला स्वातंत्र्य दिले आहे पण तुम्ही जबाबदारी स्वीकारा ..आज विद्यापीठ छोटेसे आहे पण येणाऱ्या काळात खूप मोठे काम करील असा मला विश्वास आहे. आम्ही जे उभे केले आहे ते पुढे उत्तमपणे पुढे न्या असे आवाहन त्यांनी केले. .
कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के म्हणाले ‘ कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के साहेब यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून मार्ग दाखविला त्यामुळे विद्यापीठ गतिमान झाले. कर्मवीरांच्या विचारधारेनुसार वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्देश आपण पूर्ण करणार आहोत.पदवी व पदव्युत्तर दोन्ही स्तरावर विद्यापीठाला काम करायचे आहे. विद्यापीठाला युनिव्हर्सल मान्यता मिळाली पाहिजे या दिशेने आपल्याला काम करायचे असून आता काम करण्याची अस्मिता तयार झाली पाहिजे .संशोधनाचे काम अधिक चांगले व्हायला पाहिजे. उच्चतर शिक्षा अभियानच्या निकषावर गुणवत्ता असलेले छोटे विद्यापीठ आपले असले तरी संशोधनाला गती देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे , माझे भाग्य चांगले आहे की मी रयत शिक्षण संस्थेचा ,विद्यार्थी ,प्राध्यापक म्हणून काम केले आणि आता कुलगुरू पदाची जबाबदारी मला देण्यात आली आहे. कर्मवीरांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समोर ठेवून आपल्याला काम करावे लागेल असे ते म्हणाले.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा.डॉ.विजय कुंभार यांनी केले.त्यात त्यांनी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास सांगून आजवर झालेली वाटचाल सांगितली. राज्य विद्यापीठाचा दर्जा मिळाले असून यु.जी.सी कडून पब्लिक विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली असल्याचे सांगितले. राष्ट्रीय पातळीवरील सर्व विद्यापीठाच्या संघात आपला समावेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. ४९ पदवी कोर्सेस व ३३ पदव्युत्तर कोर्सेस हे विद्यापीठात चालू असल्याचे त्यांनी केले.१९ विषयात पीएच.डी पदवीसाठीची सुविधा असून ६५ विद्यार्थी रजिस्टर झाले आहेत.नवीन शैक्षणिक धोरण नुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून त्यांची अंमलबजावणी झाली.१५ मायनर रिसर्च प्रकल्प सुरु आहेत.४ अध्यासने सुरु झालेली आहेत.१० स्कूल मंजूर झालेले आहेत.अशी माहिती देऊन त्यांनी तीन वर्षातील कामाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के,डॉ.अनिल पाटील ,डॉ.ज्ञानदेव म्हस्के,व रयतचे पदाधिकारी व विद्यापीठ पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ प्राध्यापक यांचा सत्कार यावेळी घेण्यात आला. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या वेबसाईटचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. डॉ.अनिल पाटील यांचे मार्गदर्शनाने कर्मवीर अण्णांचे स्वप्न पूर्ण झाले. प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी सूत्र संचालन केले.आभार प्रा.डॉ.मनीषा पाटील यांनी आभार मानले.
---------------------------------------
0 टिप्पण्या