Top Post Ad

आर्थिक नियोजन नसताना योजना राबवणे राज्याच्या विकासाला हानिकारक

  कोणत्याही सरकारने सर्व सामान्य जनतेसाठी योजना राबवणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. त्या राबवल्याच पाहिजे, मात्र त्या राबवत असताना आर्थिक नियोजन करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कर्ज घेऊन योजना राबवणे म्हणजे राज्याच्या विकासाला खीळ घालणे असल्याचे स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवडी विधानसभेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी आज व्यक्त केले. 


  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित 'विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका' उत्सव लोकशाहीचा २०२४ या मालिकेत बाळा नांदगावकर यांनी आपल्या पक्षाची आणि उमेदवार म्हणून स्वतःची भूमिका मांडली. यावेळी बाळा नांदगावकर यांची कन्या सृष्टी नांदगावकर तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण,  कार्यवाह शैलेंद्र शिर्के, विश्वस्त राही भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भूमिका हे नेहमीच राज ठाकरे ठरवत असतात आणि ते जे भूमिका मांडतात ती रोख ठोक असते. महाराष्ट्राच्या विकासासाठी मागील लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपला कोणत्याही अटी शर्तीशिवाय पाठिंबा जाहिर केला होता. त्यावेळी आम्ही महाराष्ट्राकरिता चार मागण्या मांडल्या होत्या. त्यातील एक म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही होती. ती पुर्ण झाली.  आजही महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू-प्रिन्ट आमच्याकडे तयार आहे. इतकेच नव्हे तर मी माझ्या स्वतःच्या विधानसभा क्षेत्राकरिता वेगळी ब्ल्यू-प्रिन्ट तयार केली आहे. ज्यामध्ये प्रत्येक वार्डच नव्हे तर त्यातील नगर, सोसायट्या यांच्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार केला आहे. म्हणूनच आज प्रत्येक वार्डात मला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कोणत्याही कामात किमान लोकप्रतिनिधीने स्वतःचे हित न बघता जनतेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे तरच आपआपल्या क्षेत्राचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास शक्य आहे. मात्र हल्ली हे फार कमी प्रमाणात पहायला मिळते अशी खंतही नांदगावकर यांनी व्यक्त केली.

शिवडी मतदार संघात बाळा नांदगावकर यांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिला नाही. पण माहिम विधानसभा मतदार संघात मात्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. यामागे खरे तर कोणतेही राजकारण नाही. माहिम विधानसभा मतदार संघात सदा सरवणकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माघार घ्यायला हवी होती. पण तसे घडले नाही. एकनाथ शिंदे त्यांना आदेश देऊ शकत नाहीत कारण महाराष्ट्रात जो सत्ताबदल झाला. शिंदेच्या पाठीशी जे आमदार उभे राहिले त्यात सदा सरवणकर हे एक होते. अशा वेळी शिंदे त्यांना आदेश देऊ शकत नाही. मात्र सरवणकर यांना ती समज असायला हवी होती. असो यामागे कोणते राजकारण नसल्याचा निर्वाळाही नांदगावकर यांनी दिली. 

या वार्तालापच्या दरम्यान नांदगावकर यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पत्रकारांसोबत असलेले आपले मैत्रीपूर्ण संबंध आजही कायम असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. शिवसेनेत असताना  निखील वागळे यांच्या कार्यालयावर हल्ला झाला तेव्हा  त्यामध्ये मी देखील होतो. त्यानंतर  वागळे यांनी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेव्हा सर्वात प्रथम त्यांना पहायला जाणाराही मीच होतो. हे त्यांनी आवर्जून सांगितले. हल्ला करताना तो पक्षाचा आदेश होता. आणि निखीलला पहायला जाताना तो त्यांचा मित्र होता. अशा तऱ्हेने प्रत्येक भूमिकेत माणसाने जगायला हवे. आणि मी नेहमीच ते जगत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com