विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे राबविण्यासाठी मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता, चोख सुरक्षाव्यवस्था आणि पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये पेयजल, रांगेमध्ये ठराविक ठिकाणी आसन व्यवस्था, प्रतीक्षालय, पंखे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, रांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वच्छतागृह, कचरापेटी, दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअर, रॅम्प, मोकळ्या मैदानाच्या ठिकाणी मंडप, दिशादर्शक फलक, मेडिकल किट आदी सुविधांचा समावेश होता. इतकेच नव्हे तर मतदारांना आपला मतदान बुथ शोधण्यात दिरंगाई होऊ नये यासाठी यावेळी कलरकोडचा वापर करण्यात आला होता. मतदान पत्रिकेवर ज्या रंगाचा कलर असेल त्या रंगाचा बूथ मंडप सज्ज करण्यात होते. स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेसोबत त्यांची नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी नेमलेल्या यंत्रणांसोबतच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही तैनात ठेवण्यात आले होते. निवडणूक कर्तव्यार्थ आदेश प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी देखील नागरी सुविधांच्या पूर्ततेच्या दृष्टीने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निवडणूक कामकाजात सेवा देण्यास सज्ज होते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एवढी यंत्रणा सज्ज असतानाही केवळ 50 टक्केच्या आसपासच मतदान झाले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ साठी मुंबईत आज २० नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले. मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या विविध नागरी सेवासुविधांनी मुंबईतील मतदार सुखावल्याचे चित्र दिसून आले. तर, मतदान केंद्रांवर उत्तम प्रकारच्या सेवासुविधा पुरविल्याबद्दल नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह प्रशासनाचे कौतूक केले. दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी मुंबईकर मतदारांचे आभार मानले आहेत. मतदानाचा हक्क बजावून नागरिकांनी लोकशाही अधिक बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अविरत आणि अथक कर्तव्य बजावणाऱ्या सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही कौतूक आहे, अशी भावना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील एकूण ३६ मतदारसंघांसाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत मतदान प्रक्रिया आज (दिनांक २० नोव्हेंबर २०२४) पार पडली. प्रथमच या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक अधिकारीपदाची संयुक्तपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी म्हणाले की, माननीय भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी (महाराष्ट्र राज्य), मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनासोबतच विविध तपास यंत्रणा, मुंबई पोलिस आणि अन्य सर्व यंत्रणांच्या सहकार्याने आणि समन्वयामुळे मुंबईतील मतदान अत्यंत चोख आणि सुरळीतपणे पार पडले. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणारे निवडणूक अधिकारी, केंद्रस्तरीय कर्मचारी, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थेत अहोरात्र तैनात असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा आर्थिक गैरव्यवहार होऊ नये, यासाठी मुंबईत कार्यरत सर्व महसूली तसेच गुप्तचर यंत्रणा, मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष सोयीसुविधा उपलब्ध करुन देणारे प्रशासनातील अधिकारी तसेच त्यांची देखभाल करणारे विविध विभागांचे कर्मचारी, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करणारे अधिकारी-कर्मचारी, बचत गट, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांचे स्वयंसेवक, आपदा मित्र, दिव्यांग मित्र यांच्यासोबतच या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांच्या योगदानामुळे मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. प्रशासनाने आपल्या वतीने मतदानासाठी विविध सोयीसुविधांची पूर्तता करून मतदान प्रक्रिया राबविली असली तरीसुद्धा ही प्रक्रिया मतदारांनी दिलेल्या प्रतिसादावर अवलंबून असते. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व ३६ मतदारसंघांतील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून ज्यांनी लोकशाही अधिक बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. यासाठी मी मुंबईतील प्रत्येक मतदाराचे आभार मानतो, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी गगराणी म्हणाले.
प्रशासनाच्या वतीने मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये ८४ मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात आले होते. त्यामध्ये संपूर्णत: युवा कर्मचाऱ्यांद्वारा संचालित, महिलांद्वारा संचालित तसेच दिव्यांगाद्वारा संचालित मतदान केंद्रांचा समावेश होता. विलेपार्ले येथील संत झेवियर माध्यमिक शाळेत सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे संपूर्ण मतदान केंद्र फुलांनी सजविण्यात आले होते. तर, अनेक ठिकाणी मतदारांचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदाराच्या मदतीसाठी ७ हजार ११५ स्वयंसेवक विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी २ हजार ८०० विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ७५० विद्यार्थी, नागरी संरक्षणातील ३२३ सदस्य, आपदा मित्र/सखी २००, नेहरू युवा केंद्राचे ३८ सदस्य आणि अन्य ३ हजार ००४ सदस्य यांचा समावेश होता. या स्वयंसेवकांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांना सहाय्य, रांगांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या. मात्र नागरिकांची उदासिनता यावेळी दिसून आली. मतदानासाठी जनजागृती करणारे
अनेक उपक्रम मुंबईत राबवण्यात आले.
तरीही केवळ 50टक्केच्या आसपास मतदान झाल्याने आता यापुढे मतदान हे सक्तीचे करावे अशी चर्चा मात्र मुंबईकर करत आहेत.
0 टिप्पण्या