विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून एकनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बसेल, असा संदेश एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते होते. त्यामुळे बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपल्याला भाजपचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, अशी अटकळ सर्वांनी बांधली होती. मात्र, दिल्लीत बुधवारी रात्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात तब्बल 40 मिनिटे बैठक झाली. यावेळी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील मराठा समाजाविषयी राजकीय समीकरणे समजावून घेतली अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
बुधवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्यानंतरही अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून राज्यातील मराठा फॅक्टरची माहिती का घेतली, याविषयी आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे.
मराठा समाज आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे. याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा झाली असल्याचीही माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदेंनी माघार घेतल्यानंतर फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र शिंदेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा तीन विभागांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला ठरल्यामुळे शिंदेंची उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. तशी ऑफरही त्यांना दिल्याचं बोललं जातं. मात्र मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर 'उप' जबाबदारी घेण्याऐवजी अन्य नेत्याला संधी देण्याचं शिंदेंच्या मनात आहे. त्याचप्रमाणे फडणवीस २.० मंत्रिमंडळात सहभागी होऊन हेविवेट खाते पदरात पाडून घेण्याचाही त्यांचा मानस असल्याचे बोलले जाते. आता दोन डिसेंबर रोजी महायुती मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासोबत गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, विजयकुमार गावित यांच्यासारख्या बड्या नेत्यांबाबत सध्या वेट अँड वॉच सुरु आहे. भाजपला 21, त्यापाठोपाठ शिंदे गटाला 12 आणि अजितदादा गटाला 10 मंत्रीपदे मिळणार आहेत. मात्र, या सगळ्यात राज्यात वचक ठेवण्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती कोणाकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदासह गृह खाते हे भाजपकडे राहणार आहे. तसेच सामान्य प्रशासन हेही अत्यंत महत्त्वाचे खाते मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे भाजपकडे राहिल. तर, अर्थ खातं अजित पवारांना दिले जाणार असून नगरविकास खातं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे असेल, अशी सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाईल. दिग्गजांऐवजी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 टिप्पण्या