बटेंगे तो कटेंगे व एक है तो सेफ है , असे द्वेषमूलक तसेच भितीयुक्त नारे देत भाजप व आर एस एस चे नेते समाजात धर्म जात जमाती पंथ भाषा प्रांत इत्यादी मधील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सौहार्दाचे व एकात्मतेचे वातावरण खराब करत आहे असे लक्षात येते . त्यासाठी भाजपचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस व योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत . तर राज्यातील काही भाजपचे व महायुतीचे नेते संभ्रमात पडले आहेत . भाजप व आर एस एस यासाठी भुतकाळातील भारतावरील इस्लामी आक्रमणांचे दाखले देऊन हिंदू विरुद्ध मुस्लिम धर्मीय जनतेच्या मनात आपसात द्वेष निर्माण करण्यासाठी झटत आहे . कारण आहे विधानसभा निवडणुका . मुस्लिम आक्रमकांनी त्याकाळी हिंदू समाजावर अतोनात अत्याचार केले होते व हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले होते . जाळपोळ करुन गावेच्या गावे उध्वस्त केले होते . हिंदूंचे जबरीने धर्मांतर केले होते . असे अनेक आरोप भाजप व आर एस एस करत असतात . हे सर्वच आरोप अगदी खरे असल्याचे आपण मानू .
सुमारे पंधराशे वर्षांपूर्वी इस्लाम स्थापन झाला व सातव्या शतकात तत्कालीन भारतातील सिंधू प्रांतात पहिले आक्रमण झाले . राज्यकर्ते ब्राह्मण वैदिक होते . ते पराजित झाले . स्वेच्छेने मुस्लिम झाले . नंतर पुढील सुमारे एक हजार वर्षांत आलेल्या परकिय मुस्लिम आक्रमकांमध्ये प्रमुख सुलतान खिलजी मोगल मानले जातात . या सर्वच आक्रमक मुस्लिमांना भारतात स्थिर होऊन यशस्वीपणे राज्य कारभार चालविण्यासाठी सगळीकडेच ब्राह्मण समाजाने त्यांच्याकडे मंत्री कारभारी कारकून ते खोजे अशा पदांवर भरपूर पगार घेऊन नोकऱ्या केल्या . तर अनेक ब्राह्मणांनी स्वेच्छेने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला . त्यांना अशरफी मुसलमान मानतात . तर हिंदू धर्मातील ब्राह्मणी वर्चस्व व जाती भेद विषमता याला कंटाळून शूद्र वंचित अस्पृश्य समजल्या गेलेल्या हिंदू बांधवांनी स्वेच्छेने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला होता . ते अजलफी पसमंदा मानले जातात . ते आजही शूद्र वंचित पिडित आहेत . पाकिस्तान अशरफी तर बांगलादेश अशरफी मुस्लिम आहेत . स्वामी विवेकानंदांचे मते भारतातील हिंदूंचे धर्मांतर नगण्य अपवाद वगळता स्वेच्छेने झाले आहे . तसेच नंतर अफगाणी बलूची अरबी इराणी इराकी तुर्की इत्यादी आक्रमक मुस्लिमांनीच कारभार केला . आजच्या भारतात यापैकी कोणीही परकिय नाहीत . सर्वच भारतीय मुस्लिम धर्मांतरित वैदिक सनातन ब्राह्मण व बहुजन हिंदू आहेत . ते सर्वच मूळचे हिंदू असून एकाच डीएनए चे असल्याचे आर एस एस सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी मान्य केले आहे . अशरफी मुस्लिमांना स्वतंत्र भारतात मोठी पदे मिळाली आहेत . तसेच त्यांना ब्राह्मणांनी जावई केलेले आहे . त्यांच्या लग्नात मोठमोठे ब्राह्मण उपस्थित असतात . आदराचे स्थान दिले जाते . तर गोरगरीब मुस्लिम मुलगा व गोरगरीब हिंदू मुलगी लग्न करत असले तर लव्ह जिहाद मानले जाते . ते लग्न उधळून लावले जाते . जर मुस्लिम राजवटीत जबरदस्तीने धर्मांतर केले असते तर पंधराव्या शतकात शंभर टक्के भारताचे इस्लामीकरण झाले असते . तसे झाले नाही . हे स्वामी विवेकानंदांचे म्हणणे योग्य ठरते .भारतीय इतिहासात पहिले आक्रमक घुसखोर आर्य वैदिक सनातन ब्राह्मण मानले जातात . यात जैन, बौद्ध, संगम भक्ती, शाक्त, अवैदिक धर्म संपवले आहेत . जगातील आर्य आक्रमक एकमेव असे होते की ज्यांनी स्थानिक प्राचिन भारतातील मूळ निवासी धर्म संपवले आहेत . तसे मुसलमान आक्रमकांनी केलेले नाही . एवढेच नाही तर ब्राह्मण वैदिक सनातन धर्माचे आहेत . तर बहुजन समाज अवैदिक हिंदू धर्माचे आहेत . ही सर्व विभागणी मुसलमानांनी केलेलीं नाही . वैदिक सनातन धर्म सर्वच हिंदू एक नसून चार वर्णात व सहा हजार पेक्षा जास्त जाती उपजाती मध्ये विभागलेला असल्याचे मानतो . म्हणजेच आम्ही सर्व हिंदू एक नाहीत . सेफ नाहीत . हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या जातींमध्ये वाटलेले आहोत . म्हणजेच बटे है . आता ब्राह्मण व शूद्र दोनच वर्ण आहेत . याच कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक करण्यास विरोध केला होता . आज तेच छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सत्ता मिळवून देण्यासाठी एक साधन झाले आहे . तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रामाणिकपणे आदर असता तर तुम्ही कोकणात राजकोट येथील शिवशिल्पात घोळ केला नसता . तीन चार टक्के ब्राह्मण व ९६-९७% बहुजन हिंदू . यातील साठ टक्क्यांहून अधिक हिंदूंना शिक्षण नाही , नोकरी नाही , शेती नाही , इज्जत नाही , मंदिर प्रवेश नाही , बरोबरीचे स्थान नाही , बरेच हक्क अधिकार स्वातंत्र्य नाहीत . जर आम्ही सर्वच हिंदू एक आहोत तर आमच्यात एवढे भेदभाव का आहेत ? नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ व देवेंद्र फडणवीस बहुजन हिंदूंना बरोबरीचे स्थान देणार आहेत काय ? आमचे धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक आर्थिक अधिकार आमच्याच सर्वोच्च मानलेल्या ब्राह्मण हिंदूंनी नाकारलेले आहेत . मुसलमानांनी नाहीत . आम्ही जेव्हा आमच्यावर होत असलेल्या ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देतो , किंवा ब्राह्मणवादी व्यवस्था नाकारतो तेव्हा त्याकडे ब्राह्मण द्वेष म्हणून पाहिले जाते . हे चूक आहे . मुस्लिम राजवटीत हिंदू प्रजेवर झालेल्या अत्याचारांसाठी ब्राह्मण मंत्री जास्त जबाबदार ठरतात . स्वातंत्र्यापूर्वी निजामशाही जूनागड मुस्लिम संस्थानात हिंदू व अजलफी मुस्लिम जनता एकमेकांना आधार देत होती . आजही तेच चित्र आहे . सन २०२० मध्ये आम्ही प्रस्ताव दिला होता की तुम्हाला मुस्लिम धर्मातील लोकांबद्दल जर एवढा अविश्वास व द्वेष वाटत असेल तसेच त्यांच्यामुळेच भाजपला राजकीय सत्ता मिळत नसेल , तर भारतीय संविधान दुरुस्ती करून मुस्लिम जनतेला असलेले मतदान अधिकार पूर्णपणे काढून घ्यावेत . परंतू त्या बदल्यात त्यांना अन्य सर्वच अधिकार मिळाले पाहिजेत . बारमाही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शिख बौद्ध भांडणे लावण्याचा धंदा बंद करून आमच्यावर उपकार करावेत . भारतात सुमारे ऐंशी टक्के जास्त हिंदू तर सोळा टक्के मुसलमान आहेत . कशाला भिती दाखवता . आम्हाला जन्मभर अन्न वस्त्र निवारा शिक्षण नोकरी आरोग्य सुविधा सुरक्षा बंधुता लोकशाही स्वातंत्र्य समन्याय समानता एकात्मता शांतता सुव्यवस्था इत्यादी मानवी विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करुन देणे . या परिस्थितीत तुम्ही नेहमी सत्ताधारी रहावे .
शेवटी नम्र निवेदन आहे की नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ व देवेंद्र फडणवीस सर्वप्रथम आम्हाला सर्वच हिंदूंना एक करण्यासाठी हिंदू धर्मात समता बंधुता स्थापित करुन सर्वच जाती नष्ट करुन सर्वांनाच सारखेच धर्माधिकार व हक्क सुध्दा मिळवून देणे . सर्वच एक . कोणीही हलका नाही . भारी नाही . असा सर्वच एक जातीय , एकजीव, एक धर्मीय , एक देशीय , एकसंध हिंदू समाज सर्वप्रथम निर्माण करणे आवश्यक आहे . तसे झाले तर हा देश आपोआपच हिंदूस्थान होईल . हिंदू राष्ट्र होईल . सदिच्छा .
- पुरुषोत्तम खेडेकर... चिखली .
- दिनांक १५-११-२०२४ .
0 टिप्पण्या