Top Post Ad

तर खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे

 महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आमचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. मात्र 132 जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्रि‍पदावरील भाजपचा दावा भक्कम झाला होता. परंतु, एकनाथ शिंदे यांनी किमान अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावे ही मागणी लावून धरली होती. परंतु, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊन शिंदे गटाच्या मागणीतील हवाच काढून टाकली. अजितदादा गटाच्या पाठिंब्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली, अशी खंत शिंदे गटाच्या रामदास कदम यांनी बोलून दाखवली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी दबावाचे राजकारण सुरु असताना भाजपच्या नेत्यांकडून ठामपणे भूमिका व्यक्त करण्यात आली होती. भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रि‍पदाचा शब्द दिला नव्हता, असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले होते. तर रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे, असे जाहीर वक्तव्य केले होते. 

 भाजप नेतृत्वाकडून आलेला संदेश आणि रामदास आठवले यांनी जाहीरपणे केलेले वक्तव्य यानंतर कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्याचे सांगितले जाते. आधी तावातावाने मुख्यमंत्रि‍पदावर दावा सांगणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची भूमिका मंगळवारी काहीशी मवाळ होताना दिसली. दीपक केसरकर यांनी भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगत सपशेल लोटांगण घातले. प्रत्येक पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, हे वाटणे स्वाभाविक आहे. पण मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे नेतृत्व निर्णय घेईल, असे वक्तव्य केसरकर यांनी केले. 

  या सर्व घडामोडीत सुरुवातीला एकनाथ शिंदे  यांनी आपल्यालाच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती करुन भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, 137 आमदारांचे पाठबळ असलेल्या भाजपने हा दबाव झुगारुन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या  शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांनी एक गुगली टाकल्यामुळे महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाच्या वृत्तानुसार, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात केंद्रात महत्त्वाच्या खात्याचे मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत. त्याऐवजी  मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे. कारण राज्यातील विधानसभा निवडणूक ही माझ्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात आली होती, तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकाळ्यात पडले आहेत. भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  एकनाथ शिंदे यांच्या ऑफरबाबत आता भाजपच्या थिंक टँकमधील नेते काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद सोडण्यास राजी असले तरी श्रीकांत शिंदे यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल, हे बघावे लागेल. कारण कालपर्यंत दिल्लीतील राजकारणाशी संबंध असलेल्या श्रीकांत शिंदे यांना थेट अजित पवारांच्या पंक्तीला आणून बसवणे, कितपत योग्य ठरेल, हा प्रश्न आहे. राजकीय आणि प्रशासकीय अनुभव या दोन्ही बाबतीत अजित पवार हे श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा कैकपटीने वरचढ आहेत. अशावेळी श्रीकांत शिंदे यांना थेट त्यांच्याच बरोबरीचे पद देणे अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांना कितपत रुचेल, याबाबत शंका आहे.  याबाबत भाजपच्या वर्तुळात अद्याप खल सुरु असून त्यामुळेच महायुती सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याची माहिती समोर आली आहे.

 मी शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे महत्त्वाचं आहे. मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. सरकार बनवताना, निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असं मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची संधी दिली आहे.  तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असं मनात आणू नका, मी अमित शाह यांनाही फोन करुन भावना सांगितल्या. जो काही निर्णय असेल तो मान्य असेल. भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असं सांगितलं आहे.  त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह जो काही निर्णय घेतील त्याला  पाठिंबा आहे.  -  एकनाथ शिंदे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com