Top Post Ad

लोकशाही मजबुतीसाठी धर्मनिरपेक्षता हे संवैधानिक मूल्य जपणे आवश्यक

समाजात धर्मा धर्मात, जाती जातीत दुही माजवणाऱ्या वृत्तींना नाकारून, सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता या संविधानाने दिलेल्या मूल्यांचे रक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची संधी या महिन्यात निवडणुकीने आपल्याला मिळाली आहे. तिचा पुरेपूर उपयोग करणे आपले कर्तव्य आहे, असे आग्रही प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी आज ठाण्यात केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या सर्वधर्म समभाव सांस्कृतिक संमेलनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विविध धर्म, जाती, भाषा, पोशाख, रितीरिवाज यानी नटलेल्या आपल्या देशात एकमेकांचा आदर करुन प्रेममय राहावं या साने गुरुजी आणि संत, विचारवंत यांच्या विचारांवर चाललो तरच देशांत शांतता नांदेल आणि प्रगती होईल. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मीय सामील होते. हा देश सर्व धर्मीय भारतीयांचा आहे, हे स्वातंत्र्य लढ्यातील मूल्य नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात उतरले आहे. त्याच्या विरोधात काम करणार्‍या सांप्रदायिक प्रयत्नांना विरोध करत समतेचे मूल्य आपण जपणे आवश्यक आहे. हे मूल्य रुजवण्यासाठी संस्थेतर्फे ईद, दिवाळी, गुरु नानक जयंती आणि नाताळच्या सणात सर्वधर्मीय संमेलने, गुरुद्वारा, चर्च व मशीद भेट आदी कार्यक्रम संस्था आयोजित करत असते, याचा त्यांनी उल्लेख केला. 

 


 सांस्कृतिक कार्यक्रम प्रेममय साने गुरुजी ....यावेळी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त, साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत ‘प्रेममय साने गुरुजी’ हा कार्यक्रम सादर झाला. साने गुरुजींच्या प्रेमळ, करुणामयी पण तितक्याच कणखर व्यक्तीमत्वाचा वेध त्यांच्या कथा, लेख, गाणी आणि साने गुरुजींवर मान्यवरांनी लिहिलेले लेख यांच्या कथनाने आणि अभिवाचनाने घेणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम, ठाण्यातील कलाकार व कार्यकर्त्यांनी सादर केला. यात, लतिका सु. मो. यांनी गुरुजींच्या जीवनावरील पत्रावळ आणि घाण या कथा सादर केल्या. नीलिमा सबनीस यांनी दलितांना पंढरपूर मंदिर प्रवेशाच्या वेळचे गुरुजींचे विचार सादर केले. अलका जोशी यांनी एस एम जोशी यांची गुरुजींचा त्यांच्यावरील प्रभाव व्यक्त करणारी नास्तिक कथा सादर केली. राजश्री भिसे यांनी गुरुजींना आलेला कडू-वाईट अनुभव आणि त्याचा त्यांच्या लेखनात उमटलेला सकारात्मक हुंकार सांगणार्‍या कथा सादर केल्या. मीनल उत्तुरकर यांनी गुरुजींचे आंतरभारतीचे विचार मांडले. विशाखा देशपांडे यांनी निवेदन करताना स्वातंत्र्य लढ्यात गुरुजी तुरुंगवासात अनन्वित अत्याचार सहन करत असतांना गुरुजींनी केलेल्या विपुल लेखनाचा वेध घेतला. संजय मंगला गोपाळ यांनी गुरुजींचे आता उठवू सारे रान हे गाणे सध्यस्थितीचा संदरर्भ देत सादर केले. खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे या सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि बलसागर भारत होवो या समूहगीताने समारोप कारण्यात आला.

क्रीडा जल्लोष बक्षीस वितरण संपन्न .... समता विचार प्रसारक संस्थेच्या आणि वी नीड यू सोसायटीच्या एकलव्य विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी नृत्य, गाणी असा रंगारंग कार्यक्रम सादर करुन मजा आणली. यात नियती कदम, पूजा गावडे, तेजश्री मगर, रूपाली तांगडे, भारती कांबळे, शिवशंकर गवळी यानी नृत्य पेश केली. विमल वर्मा हिने आत्मविश्वासाचे महत्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्मृतिशेष हिरजी गोहिल क्रीडा जल्लोष संपन्न झाला. क्रिकेट, कबड्डी, कॅरम, बुद्धीबळ हे खेळ तसेच चित्रकला, रांगोळी, मेहंदी, हस्तकला या कलांमध्ये एकलव्य  मुलांनी सहभाग घेतला. या सर्व सहभागी मुली मुलांना अध्यक्ष हर्षलता कदम, विश्वस्त मनीषा जोशी, हितचिंतक रवींद्र नी. ता. आदींच्या हस्ते बक्षिसे देण्याचा समारंभही यावेळी पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी सचिव अजय भोसले, येनोक कोलियार, पल्लवी लंके, रीतुराज परह्याड आदींनी विशेष मेहनत घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com