Top Post Ad

झूट, लूट और फूट च्या सरकारने आदर्शवत राजकारणाला गर्तेत नेलं

महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या राजकरणाला दिशा दाखवली आहे. इथे सुरु केलेल्या रोजगार हमी, महिला आरक्षण सारख्या योजना केंद्र सरकारने देशभरात चालवल्या. बळाने नाही तर नीतीने सरकार चालवण्याचा वस्तुपाठ महाराष्ट्राने देशाला घालून दिला या बद्दल देशभरात महाराष्ट्राचे नाव आदराने घेतलं जायचं पण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा राजकारणाने अशी काय पलटी मारली की आज महाराष्ट्र कुनीति आणि कुकर्माचे मॉडेल बनत आहे हे फार चिंताजनक आणि दुःखदायी आहे, असे घणाघाती आरोप भारत जोडो अभियान चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी ठाण्यात भारत जोडो अभियानातर्फे आयोजित केलेल्या लोकशाही, संविधान आणि मताधिकार संमेलनात बोलताना केले. ते पुढे म्हणाले, खोट्या राष्ट्रवादाचा आव आणणारे आणि धर्माच्या, जातीच्या नावावर दंगली घडवून आणणारे खरे देशद्रोही आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला चपराक लगावून त्यांना कुबड्यांचा आधार घेऊन सत्तेवर येण्यास भाग पाडण्यात महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली होती. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुजाण मतदारांनी या देशद्रोही आणि सत्तेचा गैरवापर करुन आलेल्या सरकारला धडा शिकवावा आणि त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडावे. 

 


भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्र राज्य संयोजक उल्का महाजन यांनी आपल्या भाषणात सरकारच्या लाडकी बहीण या योजनेवर जोरदार टीका करत म्हटलं की महिलांना पैशाचं आमिष निवडणुकीसाठी दाखवणारे सरकार महिलांच्या सुरक्षितते बाबत निकामी ठरले आहे हे राज्यात सतत घडणाऱ्या महिलावरील अत्याचार आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा हात आणि त्यांना आरोप मुक्त करण्यात सरकारचा पुढाकार यावरुन स्पष्ट दिसून येतं. शिवाजी महाराजांचा पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारे हे सरकार सामाजिक, आर्थिक बाबतीत संपूर्णपणे पराभूत झाले आहे. 

भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सरकारच्या सर्रास खोटेपणावर झोड उठवताना म्हटले की सरकारवर टीका करणाऱ्या आणि भारत जोडो अभियानात सामील असलेल्यांना अर्बन नक्षल, अराजक माजवणारे असे ठरवून संविधानाने दिलेल्या विचार आणि भाषण स्वातंत्र्याचा अपमान करण्याचे काम फडणवीस करत आहेत. सर्रास खोटे आरोप दाबून करा हीच शिकवण भाजप आणि संघातून मिळते आणि त्याच्याच आधारे हे बेईमानी सरकार चालवले जात आहे. या निवडणुकीत त्यांना पाडून लोकशाहीचा सन्मान करण्याचा पण मतदारांनी केला आहे. 

या संमेलनात शाहीर संभाजी भगत आणि सहकाऱ्यांनी संविधानाचा जलसा जोशात सादर केला. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र चव्हाण, मुक्ता श्रीवास्तव, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, विशाल जाधव, रवि घुले, अजय भोसले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com