' भारत जोडो यात्रा काढून राहुल गांधी यांनी देशात जे परिवर्तन केले, जो विश्वास लोकांना दिला, तशीच एक मोहीम राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झाली पाहिजे. ती म्हणजे देशातील यापुढील प्रत्येक निवडणूक ही बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी ती मोहीम असली पाहिजे. या कामी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी जागर करावा! ' हे सूचनावजा आवाहन केले आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिल्ली येथे संविधान दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
काँग्रेसच्या अध्यक्षांना एक ताजी गोष्ट आठवतेय का....
काँग्रेस पक्षाच्या अलीकडेच झालेल्या अधिवेशनात तुम्ही ईव्हीएम विरोधात एक ठराव संमत केला होता. मग यंदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्याचा तुम्हाला विसर कसा पडला? ईव्हीएम हटविण्याचा ' शब्द ' काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून देशवासीयांना का बरे दिला नाही? तसेच राहुल गांधी यांना ' भारत जोडो ' ऐवजी त्या यात्रेचे उद्दिष्ट ' ईव्हीएम हटाओ ' ठेवण्याचे राजकीय शहाणपण, समयसूचकता का सुचली नव्हती? तशा सूचना, विनंत्या, मागणी ईव्हीएम विरोधात आजवर नेहमीच आवाज उठवत असलेल्या अनेक संघटनांनी काँग्रेसकडे पत्राद्वारे आणि प्रसार माध्यमांतून अनेकदा केलीही होती. पण आपण त्यांच्या पत्रांना ' पोच ' देण्याचेही साधे सौजन्य कधी दाखवले नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या भरवशावर न राहता मुंबईत काही संघटनांनी ईव्हीएम विरोधात नव्याने लढण्यासाठी आजच मुंबईत पत्रकार परिषदही घेतली. खरगेजी, तुमच्या काँग्रेसचे घोडे वराती मागून निघाले आहे! मुळात ईव्हीएम विरोधात निर्णायक लढ्यासाठी मैदानात उतरण्याचे नैतिक धैर्य हे काँग्रेसच्या अंगी नाही, हे एव्हाना सगळ्यांना कळून चुकले आहे.
कारण ईव्हीएमची निवड ही तुमच्याच पक्षाची करणी आणि घोडचूक आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ सालात दिल्लीत शीखविरोधी दंगल उसळली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला विक्रमी बहुमत मिळाले होते. त्या महाविजयाला दलित नेते खासदार रामविलास पासवान यांनी त्यावेळी ' श्रद्धांजली निवडणूक ' असे संबोधले होते. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीच्या तोंडावर ' संघ ' परिवारातील दिग्गज नेते नानाजी देशमुख यांनीही ' राजीव पोरका झाला आहे, त्याला संपूर्ण देशाच्या सहानुभूतीची गरज आहे ' अशी भूमिका जाहीर केली होती. त्यांचे ते आवाहन सूचक होते. पण त्यानंतर तब्बल २५ वर्षांनी दिल्लीतील शीख विरोधी दंगलीबद्दल काँग्रेसने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात जाहीर माफी मागितली होती. आता ईव्हीएम विरोधात खरोखर निर्णायक लढा देण्याची ' इच्छा ' जागली असेल तर काँग्रेसने आपल्या घोडचुकीसाठी उभ्या देशाची आधी माफी मागायला हवी. तरच त्याला ' उपरती ' मानले जाईल.
0 टिप्पण्या