एचआयव्हीसह जगणा-या मुलांना समाजाकडून मिळणारी दुय्यम वागणूक, कलंक, भेदभाव, कौटुंबिक जबाबदा-या यामुळे काही क्षण आनंदाचे घालवणे दुरापास्त असते. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने आयोजित आनंद मेळ्याचे आयोजन आज रविवार (दिनांक १ डिसेंबर २०२४) करण्यात आले होते. यावर्षी आयोजित आनंद मेळ्यामध्ये `जगाची सफर’ या संकल्पने अंतर्गत माहिती व मनोरंजनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना विविध देशांची सफर घडवून तेथील वैशिष्ट्ये खेळांच्या माध्यमातून अवगत करून त्यांची ज्ञानवृद्धी करण्यात आली.
आनंद मेळ्यामध्ये कलागुणांना वाव देणा-या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन मुलांनी बक्षिसांची लयलूट केली. ART केंद्रात उपचार घेणा-या १४ ते १७ वयोगटातील २९८ मुलांनी आपल्या पालकांसोबत व सहभागी स्पर्धकांसोबत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच काही मुलांनी आपले अनुभवही प्रसंगी व्यक्त केले.
एचआयव्हीसह जगणा-या मुलांसाठी नियमित उपचार पद्धतीसह सर्वांगिण विकासासाठी आनंद मेळ्यासारखे उपक्रम राबविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. आज पार पडलेल्या आनंद मेळा कार्यक्रमासाठी अधिकाधिक मुलांचा सहभाग असावा यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱ्हाडे यांनी दिल्या होत्या. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे कार्य हे औषधोपचारापुरते मर्यादित नसून, एच्आयव्ही संसर्गित मुलांच्या गरजानुसार सेवा पुरविल्या जातात. ज्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण आयुष्य जगण्यास मदत होते, असे मत श्री. कुर्हाडे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीने आयोजित आनंद मेळाच्या माध्यमातून एक असा वेगळा दिवस मुले सन २०१६-१७ पासून अनुभवत आहेत.
0 टिप्पण्या