Top Post Ad

मुख्यमंत्री कोण? भाजपची नवी खेळी...

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालाला आठवडा उलटला. घवघवीत यश मिळवूनही अद्याप  महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. सत्ताधाऱ्यांना अद्याप मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवता आलेला नाही.  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरच घोडं अडलं असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही भाजपची नवी खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. विरोधकांनी इव्हीएमचा मुद्दा उचलला आहे. तो राज्यात उग्र स्वरूप धारण करू नये यासाठी मुख्यमंत्री कोण हाच मुद्दा प्रसिद्धी माध्यमांतून अधिकाधिक चर्चिला जावा अशी खेळी भाजपा करीत असल्याचे बोलले जात आहे.  राज्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर गृहमंत्रिपदासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली. दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या दिल्लीत बैठकीत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली.  

दरम्यान आमदार रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते. पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत गेले. भाजप सरचिटणीस विनोद तावडे  यांच्यासोबत अमित शाह  यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल, याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी, अशी खेळी खेळली जाऊ शकते.  अजित पवार यांच्याच विमानाने रवींद्र चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईत परत आले. शनिवारची अमावस्या संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील. देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असं सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.  मात्र यासर्व गोंधळाबाबत आरएसएसमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत यासाठी आरएसएस आग्रही आहे.  महायुतीच्या नेत्रदीपक विजयात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. भाजपचं नेतृत्त्व त्यांनीच यशस्वीपणे केलं. त्यामुळे तेच मुख्यमंत्रिपदास पात्र आहेत, असं आरएसएसला वाटतं. तर दुसरीकडे भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांची नावं चर्चेत आहेत. यातील तावडे, पाटील, मोहोळ मराठा समाजातून येतात. तर बावनकुळे ओबीसी समाजातून येतात. महायुतीच्या विजयात दोन्ही समाजांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच या दोन्ही समाजातील नेत्यांच्या नावांचा विचार भाजप नेतृत्त्वाकडून मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात येत आहे. 

 नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता आहे. त्या पदांवर बहुधा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागेल. हे दोघे मराठा समाजाचेच आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत भाजपनंही मराठा नेताच मुख्यमंत्रिपदी देण्याचं कारण नाही, असा युक्तीवाद आरएसएसने केला आहे.  भाजप महायुती विजयी झाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असा विचार करुनच आरएसएसने विधानसभा निवडणुकीत प्रचार केला.  फडणवीसांच्या नेतृत्त्वात यश मिळालं. मग त्याचं श्रेय त्यांना देऊन मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव जाहीर करण्यास उशीर का होतोय, असा आरएसएसचा सवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.  दरम्यान नव्या सरकारचा येत्या 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात शपथविधी पार पडणार आहे. नवे मुख्यमंत्री कोण या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरीही शंकरनगर व इतरत्र पश्चिम नागपुरातील एका होर्डिंगने देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील असे भक्कम संकेत दिले आहेत. फडणवीस यांच्या फोटोसह नागपुरात अशा आशयाचे होर्डिंग लागले आहेत.   सोमवार किंवा मंगळवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडला जाईल. त्यात फडणवीसांची निवड होईल आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाजप नेत्याने माहिती दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com