मुंबईतील घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणाऱया राडारोड्यावर (डेब्रीज) शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्प्रक्रिया करुन ते वापरायोग्य करण्याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने दहिसर येथे बांधकाम आणि पाडकाम कचरा (कन्स्ट्रक्शन अॅण्ड डिमोलिशन वेस्ट) शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. कोकणीपाडा - दहिसर येथे पाच एकर जागेवर उभारलेल्या या प्रकल्पाची प्रतिदिन प्रक्रिया क्षमता ६०० टन इतकी आहे. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरांत निर्माण होणा-या राडारोड्यावर या प्रकल्पात पुनर्प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्प अंतर्गत प्राथमिक चाचणीसाठी दिनांक १४ ऑगस्ट २०२४ पासून राडारोडा संकलन सुरु करण्यात आले होते. तर दिनांक ४ नोव्हेंबर २०२४ पासून प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पात दिनांक १८ डिसेंबर २०२४ पर्यंत प्राप्त १७ हजार ६०० मेट्रिक टन राडारोड्यापैकी १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यासारख्या संरचनाविरहीत (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी वापरात आणले जात आहेत. पश्चिम उपनगरातील ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यापासून आजतागायत २२० कॉल्स प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ५४ मेट्रिक टन राडारोडा संकलित करण्यात आला आहे.केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सन २०१६ मध्ये बांधकाम कचऱ्याचे नियमन करण्यासाठी ‘बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम’ अंमलबजावणी सुरू केली आहे. या नियमांनुसार, ‘बांधकाम आणि पाडकाम कचरा’ याचा अर्थ कोणत्याही नागरी वास्तूच्या बांधकामातून, पुनर्रचनेतून, दुरुस्तीतून अथवा पाडकामातून निर्माण झालेला कचरा होय. त्यात बांधकामासाठी लागणारे साहित्य, राडारोडा आणि दगडविटा यांचा समावेश असतो. यामध्ये कचरा निर्माण करणाऱ्याची कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत. काँक्रिट, माती व अन्य माल जमा करणे आणि वेगळा करणे; तसेच अन्य माल व निर्माण झालेला बांधकाम आणि पाडकाम कचरा साठवणे यांचा समावेश आहे.
कचरा निर्माण करणाऱ्याने हा कचरा आपल्याच आवारात साठवणे, स्थानिक प्राधिकरण संकलन केंद्रात जमा करणे किंवा अधिकृत प्रक्रिया सुविधा केंद्राकडे सुपूर्द करणे सक्तीचे करण्यात आले आहे. रस्त्यावर अथवा नाल्यांवर कचरा साचणार नाही, याची खबरदारी घेणेही त्यांना सक्तीचे आहे. याशिवाय, कचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येकालाच कचरा संकलनासाठी, वाहतुकीसाठी, प्रक्रियेसाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी आर्थिक भार उचलणे क्रमप्राप्त आहे. निर्धारित नियमांनुसार, कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी निर्देश सूचित करणे आणि स्वतः अथवा नियुक्त खासगी ठेकेदाराकरवी विल्हेवाटीची व्यवस्था करणे हे देखील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिवार्य केले आहे.त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामाचा कचरा तसेच राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा (कन्स्ट्रक्शन अॅण्ड डिमोलिशन वेस्ट) शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प सुरु केला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) श्री. किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पांचे कामकाज वेगाने सुरू आहे.
राडारोडा संकलन, वाहतूक, त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, त्यासाठी जागा मिळवून प्रकल्प उभारणे, मनुष्यबळ व संयंत्रे इत्यादी यंत्रणा उभी करणे, या सर्व बाबींची जबाबदारी ही कंत्राटदारावरच सोपविण्यात आली आहे. परिणामी महानगरपालिकेवर प्रकल्प जागा, भांडवली गुंतवणूक, परिरक्षण व तत्सम भांडवली बाबीच्या खर्चाचा भार आलेला नाही. महानगरपालिकेने पुढील २० वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. पश्चिम उपनगरांसाठी (वांद्रे ते दहिसर) मेसर्स एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा प्रकल्प हा दहिसर, कोकणीपाडा येथे पाच एकर जागेवर स्थित आहे.
या प्रकल्पात राडारोड्याचे सुरक्षित आणि कार्यक्षम संकलन आणि वाहतुकीसाठी विशेष वाहनांच्या ताफ्याचा वापर केला जात आहे. प्रगत प्रक्रिया संयंत्रांमध्ये, पर्यावरणीय नियमांचे पालन करून, नवीनतम तंत्रज्ञान वापरून कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जात आहे. या प्रकल्पातून उत्पादित केलेली पुनर्नवीनीकरण सामग्री नवीन बांधकाम प्रकल्पांमध्ये पुनर्वापरासाठी उपलब्ध आहे. पश्चिम उपनगरातील ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक सकाळी ८.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत उपलब्ध करुन दिला आहे. घरगुती तसेच लहान स्तरांवरील बांधकाम, पाडकाम, दुरुस्तीची कामे यातून निर्माण होणा-या राडारोड्याचे संकलन करुन वाहून नेण्यासाठी ही सेवा माफक दरात कार्यरत आहे. रस्त्यावर तसेच इतरत्र टाकून देण्यात येणा-या राडारोड्याचे प्रकार टाळण्यासाठी सुरु केलेली ही सेवा अल्पावधीत नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे.
दहिसर येथील प्रकल्पात दिनांक १४ ऑगस्ट पासून ते १८ डिसेंबर २०२४ या कालावधीत १७ हजार ६०० मेट्रिक टन प्राप्त राडारोड्यापैकी १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड, बाक (बेंच) यासारख्या संरचनाविरहीत (नॉन स्ट्रक्चरल) बाबींच्या निर्मितीसाठी वापरात आणले जात आहेत. पश्चिम उपनगरातील ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर केल्यापासून आजतागायत २२० कॉल्स आले आहेत. त्याद्वारे ५४ मेट्रिक टन राडारोडा संकलित करण्यात आला आहे.
महानगरपालिकेकडे मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी करुन खातरजमा करतात. राडारोडा वाहून नेण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा अंदाज घेतात. त्यांच्याकडून मागणी मंजूर होवून लागू असणारे शुल्क ऍपद्वारे कळवले जाते. मागणी मंजूर केल्याचे संबंधित नागरिकांस मोबाईल ऍपवर, व्हॉटस्ऍपवर कळवले जाते. निर्धारित शुल्क भरणा केल्यानंतर ४८ तासांच्या आतमध्ये राडारोडा संकलन करुन वाहून नेण्यात येतो. नव्या स्वरुपात सुरु केलेली ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा नुकतीच सुरु झाली असून प्रारंभीचा कालावधी हा प्रायोगिक स्वरुपाचा आहे. नागरिकांना या सेवेमध्ये येणारे अनुभव लक्षात घेवून, त्यांच्या सूचना विचारात घेवून त्यात अधिकाधिक सुधारणा करण्यात येतील, मुंबईकरांनी या ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेला अधिकाधिक प्रतिसाद द्यावा,--- किरण दिघावकर... उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी)
0 टिप्पण्या