आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेल्या आणि समग्र व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणाऱ्या "आंबेडकरी आई" या अभिनव ग्रंथाचे शनिवारी मोठ्या दणक्यात प्रकाशन झाले. या ग्रंथात ४२ मुलींनी त्यांच्या आईने आंबेडकरी मूल्यांच्याआधारे त्यांना कसे घडवले, याचे सत्यकथन आहे. या निमित्ताने आंबेडकरी स्त्री संघटनेने आंबेडकरी आई या नव्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आहे.डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळ आणि आंबेडकरी स्त्री संघटनेच्या पुढाकाराने दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात माजी कुलगुरू अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. प्रज्ञा पवार, डॉ. अजित मगदुम यांच्या उपस्थित या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
ज्येष्ठ लेखिका प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्यामल गरुड यांनी 'आंबेडकरी आई’ पुस्तक संपादित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या स्त्रिया स्वत: कशा जगल्या, गरिबी असूनही त्यांनी कसे दिवस काढले आणि आपल्या मुलांना कसं घडवले याचा पट ४२ मुलींनी या ग्रंथात मांडला आहे. या ग्रंथात दिसणाऱ्या आईचे मातृत्व हे जैविक मातृत्वापासून सामाजिक मातृत्वापर्यंत सामावलेले आहे. हे फक्त आईचं चरित्र नसून ते आजी, पणजीचं चरित्र आहे. आंबेडकरी आई या नावातच संघर्षाचा पट आहे. या आईंनी आपल्या लेकींना जीवनाचे सत्व, तत्व दिले. आंबेडकरी आईचा प्रवास हा मनुस्मृतीपासून संविधानसंस्कृती पर्यंतचा आहे. हे केवळ स्मृतीरंजन नाही असे प्रतिपादन डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी यावेळी केले.
आपल्या भाषणात डॉ. अजित मगदुम म्हणाल्या की, आईविषयी लिहायचं म्हटलं की भावनिकता येते. पण हे लेखन भावनिकतेने लिहिलेले नसून तटस्थपणे वास्तव मांडणी आहे. या आंबेडकरी आईंनी आपल्या नैतिक विचारातून, व्यावहारिक शहाणपणातून सामाजिक चारित्र्याचा वस्तुपाठ ठेवला आहे.तो सर्व समाजाला दिशादर्शक ठरेल. डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आमच्यासाठी शिक्षण म्हणजे अक्षर ओळख नव्हे. गुलामीला उत्तर देण्याची सुरुवात शिक्षणाने होते. याचे भान असणाऱ्या या आई आहेत, असे प्रतिपादन केले.
तर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी आंबेडकरी आईत आत्ममग्नता नाही, असे सांगून दलित सहित्याचे हे पुढचे स्थित्यंतर आहे असा गौरव केला. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ग्रंथांचा संदर्भ देत या ग्रंथाचे समाजशास्त्रीय विश्लेषण केले. दलित साहित्यातील साचलेपण या पुस्तकाने दूर केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
दरम्यान, ग्रंथाच्या संपादिका प्रा. आशालता कांबळे यांनी या ग्रंथाची संकल्पना मांडली. नंदा कांबळे आणि सुरेखा पैठणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात प्रणेश वालावलकर यांनी रेखाटलेले प्रत्येक आईचे रेखाचित्र पडद्यावर दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला पुस्तकात वर्णन केलेल्या अनेक आईंनी उपस्थिती लावली होती. यात उर्मिला पवार, हिराताई बनसोडे, हिराताई पवार याही उपस्थित होत्या. याशिवाय ज्योती म्हापसेकर, ज. वि, पवार, सुरज येंगडे, डॉ. श्रीधर पवार यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. दीक्षा राजेश शिर्के आणि वैभवी अडसूळ यांनी आपल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली
------------------------------------
श्यामच्या आईने केली लाईट गुल तरीही,
शनिवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात डाॅक्टर भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते "आंबेडकरी आई" या ग्रंथाचे प्रकाशन प्रचंड गर्दीत संपन्न झाले. आपण या सभागृहाचा फोटो बघा. किती तरी वर्षाने अशा प्रचंड गर्दीचा अनुभव या सभागृहाने घेतला आहे. कारण कोणताही कार्यक्रम असो, या सभागृहात अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या कधी भरल्याच नाही. मी साडेपाच वाजता सभागृहात प्रवेश केला तेंव्हा मलासुद्धा बसायला खुर्ची उपलब्ध नव्हती.
माझ्याबरोबर असंख्य लोक उभे राहून कार्यक्रम ऐकत होते. कधी नव्हे ते या सभागृहात मोठ्ठा डिजिटल स्क्रीन लावला होता. मी यायच्या आधी पाच मिनिटापूर्वीच कार्यक्रम सुरू झाल्याचे समजले. विचार मंचावर सिसिलीया कार्व्हालो बोलत होत्या. अत्यंत खुसखुशीत पध्दतीने त्यांनी या पुस्तकाचे वर्णन केले. एक प्रकारचं आत्मचरित्र व इतिहास या दोन्ही सीमारेषेवर असणारं हे पुस्तक असून यात अनेक ऐतिहासिक संदर्भ आल्याने एकूणच मराठी साहित्यातील हा एक महत्वाचा संदर्भ ग्रंथच झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर डाॅक्टर अजित मगदूम याचं भाषण झालं. त्यांनी या ग्रंथातील लेखांचं आपल्या भाषेत निरुपण केलं.
त्या नंतर आलेल्या डाॅक्टर प्रज्ञा दया पवारांचं भाषण मात्र अत्यंत प्रभावी, मुद्देसूद आणि सडेतोड झालं. प्रामुख्याने त्यांनी श्यामच्या आई व आंबेडकरी आई यातला फरक अत्यंत सुंदररीत्या उलगडवन दाखविला. श्यामची आई श्याम ला म्हणते की, जशी पायाला घाण लागल्यावर आपण पाय स्वच्छ करतो तसेच आपलं मनही आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. पण साने गुरुजी एवढ्यावरच थांबतात. मनाला लागू शकणार्या जातीपातीच्या, उच्चनीचतेच्या घाणीविषयी साने गुरुजी काहीच बोलत नाहीत. या ठिकाणी ते मुद्दामहून सोयीस्कर मौन बाळगतात. आणि इथूनच श्यामच्या आईमध्ये आणि आंबेडकरी आईमध्ये फरक पडण्यास सुरुवात होते. आंबेडकरी चळवळीचही आता "हनुमानीकरण" झालय, ही त्यांनी केलेली टिपण्णी खरोखरच अफलातून होती. त्यानंतर मुणगेकरांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन करण्यापूर्वी त्यांचं जे भाषण झालं त्यात पुस्तकाविषयी थोडं आणि ते काँग्रेसमध्ये असल्याने ती भूमिका स्पष्ट करण्यातच त्यांनी बराच वेळ खर्च केला. ऐनवेळेस आलेल्या आंतरराष्ट्रीय आंबेडकरी अभ्यासक असणाऱ्या एंगडेंना बोलण्याची संधी दिली. त्यानेही सुरवातीलाच आपण या पुस्तकाच्या ५० प्रतींची ऑर्डर दिल्याचे जाहीर केले. आंबेडकरी चळवळीने वर्णवादाबरोबरच वर्गवादाविरोधातही संघर्ष करायला हवा असे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम चालू असतानाच अचानक लाईट गेली. लाईट गेली म्हणजे फक्त सभागृहातीलच लाईट गेली. बाकी रस्त्यावरची, बिल्डिंगची अगदी सभागृहातील ऑफिसचीही लाईट होती. फक्त सभागृहाचीच लाईट गेली नव्हे घालवली होती. याचा अर्थ हा जाणून, बुजून कुणीतरी आगाऊपणा केला होता. ज्याने कोणी हा आगाऊपणा केला होता त्याला हा कार्यक्रम बंद करायचा असावा. पण त्या अंधारातही दिक्षा व वैभवी या आमच्या जयभीमच्या लेकींनी आपल्या खणखणीत आवाजात चळवळीची गाणी गायला सुरुवात केली. जवळ, जवळ अर्धा तास या लेकी गाणी गात होत्या. लाईट बंद करुनही कार्यक्रम बंद होत नाही हे पाहुन अखेर पुन्हा लाईट सुरू केली गेली आणि स्वच्छ प्रकाशात न थांबलेला कार्यक्रम पुन्हा दणक्यात सुरू झाला. मनात विचार आला, "श्यामच्या आईने केला लाईट गुल्ल तरीही आंबेडकरी आईचा कार्यक्रम सुपर, डुपर हाऊसफुल्ल! जयभीम!
- विवेक मोरे
0 टिप्पण्या