Top Post Ad

६१ किलो प्लास्टिक जप्त, १ लाख ४५ रुपयांचा दंड वसूल..प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र..

महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज (दिनांक २० जानेवारी २०२५) एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक विरोधी ही मोहीम यापुढे देखील तीव्र गतीने सुरु राहणार आहे.

 बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखाली बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्‍यात येत आहे. यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरु राहणार आहे. उप आयुक्‍त (विशेष) श्रीमती चंदा जाधव यांच्‍या सूचनेनुसार पथके गठीत करण्यात आली आहेत. पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तुंवर प्रभावीपणे कारवाई होण्यास मदत होत आहे.


 उप आयुक्‍त (विशेष) श्रीमती चंदा जाधव म्‍हणाल्‍या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली आहे. दिनांक १ जानेवारी २०२५ ते दिनांक १९ जानेवारी २०२५ या कालावधीत ५ हजार ७८३ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११८ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे १६७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.  तर एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तर, आज (दिनांक २० जानेवारी २०२५) एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.  

 महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही अधिसूचना व सुधारणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. (https://www.mpcb.gov.in/waste-management/plastic-waste). या अधिसूचनेनुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ ही दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ आणि केंद्रीय शासनाची सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ अंतर्गत विविध वस्तुंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवण प्रतिबंधित आहेत.

 मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तुंचा वापर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) करु नये.  कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन उप आयुक्‍त (विशेष) श्रीमती चंदा जाधव यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com