ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत. त्यानुसार, महापालिकेने धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एकूण २९७ बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या ३९ बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांनी नियमावलीचे तत्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीने काम थांबण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यापैकी, ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केले आहे. तर, १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले आहे. तर, ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीने पूर्तता न झाल्यास तत्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच, सर्व २९७ बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचे पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागाने सतत करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत, हवा प्रदूषणाबाबत महापालिकेकडे प्राप्त झालेल्या विविध तक्रारींबाबत पर्यावरण विभागाने १,७०,००० रुपये दंडाची कारवाई केली असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, ठाण्यातील विकासकांद्वारे त्यांच्या प्रकल्पात, ५० ठिकाणी हवा प्रदूषण मोजणीचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची सातत्याने पाहणी पर्यावरण विभागामार्फत केली जात आहे. इतर व्यावसायिकांनीही ही यंत्रणा ताबडतोब बसवावी. त्याबाबत हयगय झाल्यास कारवाई करावी, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.
पालापाचोळा जाळणाऱ्यांवर कारवाई- ठाणे महापालिका क्षेत्रात उघड्यावर पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक जाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत त्याबाबतच्या ०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पाहणी करून २० हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच, हॉटेल्स, तंदूर, रेस्टॉरंट, बेकरी येथे जळाऊ लाकूड वापरण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे.
तोडफोड कचऱ्याची विल्हेवाट- ठाणे महापालिकेचा बांधकाम व तोडफोड कचरा विल्हेवाट प्रकल्प ३०० टन क्षमतेचा आहे. या प्रकल्पात मार्च २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या काळात ७४१४ टन तोडफोड कचऱ्याचे संकलन आणि पुनर्वापर करण्यात आले आहे. त्याचबरोबर, सर्व बांधकाम विकासक आणि ठेकेदार यांनी जीपीएस यंत्रणा असलेल्या वाहनांमधूनच डेब्रिज वाहतूक करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
५९०९ वाहनांवर कारवाई- ठाणे महापालिकेतर्फे प्रादेशिक परिवहन विभागाशी समन्वय साधून आनंद नगर चेक नाका व दहिसर चेक नाका येथे डेब्रिज वाहतूक करणाऱ्या व ताडपत्री नसलेल्या एकूण ५९०९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पीयूसी नसलेल्या ४००८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. डेब्रिजची विल्हेवाट लावण्यात येणाऱ्या स्थळाचा वाहतूक पास असल्याशिवाय अशा वाहनांना ठाणे महापालिका हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक व इमेल- हवा प्रजूषण नियंत्रणाबदद्लच्या तक्रारी करण्यासाठी ८६५७८८७१०१ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचबरोबर, pcctmc.ho@gmail.com या इमेलवरही तक्रार नोंदवता येईल.
0 टिप्पण्या