Top Post Ad

मुंबईत ११ व १२ जानेवारी रोजी ७५वा कोकण बाजार अमृत सोहळा

मराठी माणूसच मराठी माणसाला उद्योगात मोठा ठरू शकतो, ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांना शिरस्थानी ठेवणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजायला हवी. यासाठी  मागील चार वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि १००% मराठी उद्योजकांच्या कोकण बाजार विक्री प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यावर सातत्याने काम करत आहोत. यामधून मराठी माणसे एकत्र येतात, एकमेकांना साथ देतात. व्यावसायिक स्पर्धेत कटुता येऊ देत नाहीत, अगदी कट्टर स्पर्धक सुद्धा एकमेकांना मदत करून सौदार्हाने काम करतात. ग्राहक आणि उद्योजकांमध्ये घरचे संबंध असल्यासारखी जवळीक निर्माण होते यासाठी कोकण बाजार हा मोठा सोशल प्लेटफ़ॉर्म ठरला असल्याची माहिती कोकण बाजारचे संस्थापक अध्यक्ष अजय यादव यांनी दिली. येत्या ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी आयोजित होणाऱ्या ७५व्या कोकण बाजार अमृत सोहळ्याचे आयोजन दादर या ठिकाणी करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देण्याकरिता कोकण बाजारच्या वतीने मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यवाहक श्रीकांत कोकाटे, कोषाध्यक्ष जयेश सावंत, चिटणीस विकास निकम उपस्थित होते. 


 एका सामान्य मराठी व्यक्तीला उद्योग सुरु करताना सर्वात मोठं आव्हान कोणतं असतं - ग्राहक मिळवण्याचं. - त्यासाठी त्याला दुकान थाटावं लागतं, त्याचं भाडं भरणे, ग्राहक आणण्यासाठी मार्केटिंग करणे, आणि यासाठी वर्षानुवर्षे कष्ट करून साठवलेल्या पैशाची, कधी उसने घेतलेल्या, तर कधी लोन घेतलेल्या पैशाची ताकद तर वापरावी लागतेच, पण सोबत आसपासच्या, अगदी घरातल्या सुद्धा नकारात्मक मानसिकतेला तोंड द्यावं लागतं, आयुष्यात कधीही व्यवसाय न केलेल्या नातेवाईकाचे, शेजाऱ्याचे, मित्रांचे टोमणे ऐकावे लागतात. वर उद्योगात यशस्वी होण्याची शास्वती तशी कमीच. कोकण बाजारची अनोखी इकोसिस्टिम या सर्व समस्यांवर उपाययोजना करून त्या सर्व उद्योजकांना हक्काचं मार्केट आणि सोबत व्यवसाय वाढीसाठी लागणारे सकारात्मक वातावरणाची निर्मिती करते. यासाठी कोकण बाजारकडे अनेक उद्योजकच नव्हे तर ग्राहकवर्ग देखील आकर्षित होत असल्याचे कार्यवाहक श्रीकांत कोकाटे यांनी सांगितले. 

 कोकण बाजार मंच, हि प्रोफेशनली मॅनेज केली जाणारी फेसबुक कोम्मुनिटी सुरु करून, मराठी नवउद्योजकांना साथ देण्यासाठी, एक लाखाहून अधिक समविचारी मराठी लोकांना एकत्र आणले आहे.  मराठी कोकणी समुदायाला एकत्र आणणे आणि सहकार्याची भावना प्रोत्साहित करणे. ऑनलाईन खरेदीत होणाऱ्या फसवणुकीपासून समविचारी ग्राहकांचे संरक्षणाकरिता काटेकोर व्यवस्थापन केले ज्यामुळे चार वर्षात एकही ऑनलाईन फ्रॉड झाला नाही. ग्राहकांची योग्य काळजी घेतल्याने मराठी उद्योजक घडवण्यात यश मिळत आहे. 

अगदी घरातून, शून्यातून सुरुवात झालेले उद्योजक आज व्यवसाय वाढीच्या तिसऱ्या तर कुणी चौथ्या टप्प्यात आहेत. मराठी उद्योजकांची योग्य मानसिकता घडवण्यासाठी आणि विक्री वाढवण्यासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते. आजपर्यंत ५५० हून अधिक नव्याने सुरु होणाऱ्या मराठी उद्योजकांसाठी हक्काचं मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम कोकण बाजारने केले आहे.  कोव्हिडची लाट ओसरताच समुदायातील समविचारी ग्राहक आणि उद्योजकांची थेट भेट घडण्यासाठी विक्री प्रदर्शन सुरु केले. तीन वर्षात सातत्याने काम करून ७५ वे विक्री प्रदर्शन आयोजित होत आहे.  कोकण बाजार हि फक्त आणि फक्त मराठी उद्योजकांसाठी राखीव इकोसिस्टिम आहे, यात आजवर एकही स्टॉल किंवा एकही ऑनलाईन पोस्ट बिगरमराठी विक्रेत्याला दिली गेली नाही.

"आपला समुदाय, आपला बाजार" हे आमचे ब्रीद आहे, जे कोकण बाजारच्या लोगोमध्येही अंतर्भूत आहे. आम्हाला विश्वास आहे की, जर  मेहनती आणि प्रामाणिक व्यावसायिकांकडून उत्पादने खरेदी केली तर त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यास मोठी मदत मिळेल. हे प्रदर्शन केवळ विक्रीसाठी नाही, तर मराठी आर्थिक क्रांतीचा एक महत्वाचा भाग आहे.


   मुंबई हे आपल्या मराठी माणसाचं हक्काचं शहर, भारताची आर्थिक राजधानी, मुंबईबाहेरील लोकांचं स्वप्नातलं शहर. परंतु, आज टपरीवरच्या पानवाल्यापासून ते मिठाईच्या दुकानापर्यंत आणि गल्लीतल्या भाजीवाल्यापासून ते हॉटेल, ट्रान्सपोर्ट, फायनान्स, शॉपिंग मॉल, अशा मुंबईतील प्रत्येक उद्योजकीय क्षेत्रात आपण मागे का? मुंबईत घर वगैरे घ्यायचं स्वप्न सुद्धा आता पाहणं बंद झालंय वसई, विरार, डोंबिवलीत घर घेताना बऱ्याचदा गावची जमीन विकावी लागते? इतकी वाईट परिस्थिती? बरं - मराठी माणूस आळशी आहे का? तर मुळीच नाही, ह्यां सगळ्यांची घरं आपणंच भरतोय, नोकरीत १२-१४ तास मर मर मारतोय, आणि कुणी उद्योग करायचा म्हटलं तर त्यात १०० अडचणी, त्या अडचणींवर कुणी मात केलीच, तरीही परप्रांतीयांची लॉबी त्याला धड स्थिर सुद्धा होऊ देत नाही. महत्वाचं म्हणजे सामान्य मराठी माणसाला याचं अजिबात गांभीर्य नाही, तो सगळं बघतोय, चिडतोय, कधी वाद घालतोय तर कधी टाळकी सुद्धा फोडतोय, पण परिस्थिती जैसे थे ! परिस्थिती बदलत नाही कारण, समाज रसातळाला जात असताना, तो आजही परप्रांतीयांकडूनच खरेदी करतो. प्रॉब्लेम आणि सोलुशन दोन्हीही आपणच आहोत ना, हे मान्य करून त्याच्या खरेदीचा पॅटर्न बदलायला हवा. यासाठी कोकण बाजारच्या   ७५ व्या प्रदर्शनामध्ये कोकण बाजारच्या प्रवासाचे आणि यशोगाथांचे सादरीकरण असेल.  कोकण बाजार टीम आणि इतर मान्यवरांसोबत उपस्थित इन्फ्लुएंसर्ससाठी खुल्या चर्चेची संधी यामध्ये उपलब्ध होणार आहे.  दिनांकः ११ आणि १२ जानेवारी रोजी दादर शिवाजी पार्क येथील स्काऊट हॉल, येथे सकाळी १०:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. तरी सर्वांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन कोकण बाजारच्या टीमकडून करण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com