'क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा' या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन स्वच्छतेची पातळी उंचावण्यासाठी व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 'कचरा मुक्त तास' मोहीम हाती घेणार आहे. बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत 'कचरा मुक्त तास' मोहीम राबविली जाणार आहे. रेल्वे स्थानक परिसर, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, वाणिज्यिक परिसर, पर्यटन स्थळे आणि वर्दळीच्या ठिकाणी तसेच खाऊ गल्लींमध्ये सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
कचरा मुक्त तास (गार्बेज फ्री आवर) या मोहिमेचा शुभारंभ बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी अध्यक्षतेखाली या मोहिमेची पूर्वतयारी संदर्भात बैठक आज १४ जानेवारी रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. सह आयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप आयुक्त (परिमंडळ ५) देवीदास क्षीरसागर, उप आयुक्त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ १) डॉ.(श्रीमती) संगीता हसनाळे, उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) शरद उघडे यांच्यासह प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय कार्यालयांसाठी '१०० दिवसांचा कृती आराखडा' निश्चित केला आहे. त्यात स्वच्छतेवर देखील भर देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका गत ५५ आठवडे 'सखोल स्वच्छता मोहीम' राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण २४ प्रशासकीय विभागात कचरा मुक्त तास (गार्बेज फ्री आवर) ही विशेष मोहीम राबवणार आहे. रेल्वे स्थानक परिसर (पूर्व आणि पश्चिम), धार्मिक स्थळे, बाजारपेठा / निवासी क्षेत्र / वाणिज्यिक क्षेत्र, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११:०० ते दुपारी १:०० दरम्यान ही मोहीम राबविण्यात येईल.
महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या या मोहीमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, बिगर शासकीय संस्था (एनजीओ), राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था यांना सहभागी करून घेतले जाईल.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. जोशी म्हणाल्या की, या मोहीम अंतर्गत खाऊ गल्ल्यांच्या ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार आहे. मुंबईत असणारी विविध कार्यालये तसेच पर्यटकांचा ओढा असलेल्या परिसरांमध्ये खाऊ गल्ल्या विशेषत्वाने आहेत. अशा सर्व परिसरांमध्ये खाऊ गल्ल्यांच्या परिसरावर अधिक लक्ष केंद्रीत करून स्वच्छता करण्यात येईल. तसेच, स्वच्छता केल्यानंतर संबंधित परिसर नेहमी स्वच्छ राखण्यासाठी सर्व संबंधितांना सूचना देण्यात येतील. या सूचनांचे पालन न करणा-या / उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेदेखील डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.
उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, कचरा मुक्त तास (गार्बेज फ्री आवर) या मोहिमेसाठी अंमलबजावणी आराखडा तयार करण्यात आला आहे. विभागांचे सहायक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन विभाग) आणि संबंधित परिमंडळ कार्यकारी अभियंता मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करतील. परिमंडळ कार्यकारी अभियंता साप्ताहिक कार्यक्रमासाठी कार्यक्षेत्रातील भागांची निवड करतील. सहभागी सर्व कर्मचारी गणवेश, संरक्षणात्मक उपकरणे आणि आवश्यक साधनांनी सज्ज असतील. सकाळी ११:०० वाजता नियोजित क्षेत्राची स्वच्छता केली जाईल. साचलेली धूळ तसेच पाणी साचण्याची ठिकाणे स्वच्छ केली जातील. नंतर रस्ते, पदपथ आणि भिंती इत्यादी सर्व संयंत्रे, टँकरच्या सहाय्याने स्वच्छ केल्या जातील.
कचरा मुक्त तास या मोहीमेची व्याप्ती स्पष्ट करताना उप आयुक्त दिघावकर म्हणाले की, अडगळीत साचलेला व दुर्लक्षित कचरा, बांधकाम राडारोडा प्राधान्याने संकलित केला जाईल. त्याची छायाचित्रे घेतली जातील. चाळी, झोपडपट्ट्या अशा दाट वस्तीच्या भागांतील अंतर्गत रस्ते व गल्लीबोळ स्वच्छ ठेवले जातील. बेवारस वाहनांवर कारवाई केली जाईल. पार्किंग केलेल्या वाहनांच्या खालील कचरा काढला जाईल. बेवारस / भंगार साहित्य आणि सामग्रीची विल्हेवाट लावली जाईल. रस्ते, रस्ते दुभाजक, सार्वजनिक भिंतींवरील धूळ, थुंकलेल्या जागा, भित्तीपत्रके, स्टिकर्स किंवा भित्तीचित्रे स्वच्छ केली जातील. पदपथ व दुभाजकांच्या दगडी कडा पूर्णतः स्वच्छ करण्यात येतील. रस्त्यांलगतच्या कचरापेट्या स्वच्छ करण्यात येतील. झाडांच्या संरक्षक जाळ्यांवर साचलेला कचरा पूर्णतः हटविला जाईल. जलवाहिन्यांच्या प्रवेशद्वारांवरील कचरा काढण्यात येईल. रस्ते, पदपथ व दुभाजकांवरील अनावश्यक उगवलेली झाडे-झुडुपे काढण्यात येतील. निवडलेल्या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे पूर्णतः स्वच्छ केली जातील. मोहिमेच्या ठिकाणी मार्शल तैनात करण्यात येतील. तसेच स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पथनाट्य / फ्लॅश मॉब / पोवाडे / इतर लोककला सादर केल्या जातील, असे दिघावकर यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या