Top Post Ad

पत्रकार तुषार खरात यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज

  तुषार खरात या लई भारी युट्यूब चॅनलचे संपादक यांना अटक झाली आहे. तुषारवर जयकुमार गोरे यांनी व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणे एकवेळ समजू शकेल, पण महिलेचा विनयभंग, खंडणी, अट्रोसिटी हे गुन्हे लावले आहेत. ज्यातून तो  तुरुंगाच्या बाहेरच येऊ शकणार नाही. जयकुमार गोरे यांच्यावर बातमी केल्यावर मगच हे सर्व गुन्हे लागतात हा काय योगायोग आहे का ? एका दिवसात तो हे सर्व गुन्हे करतो काय ?  सूडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटना आणि विरोधी पक्ष यांनी आवाज उठवला नाहीतर ही पद्धत कायमच वापरली जाईल. 

   तुषारचे अटक होण्यापूर्वीचे video बघताना गलबलून आले. माझ्या मागे आता कोणी नाही असे तो सांगतो आहे. मी वकील सुध्दा देऊ शकत नाही अशी माझी आर्थिक स्थिती असल्याचे तो सांगतो. तुषार हा २००५ पासून पत्रकार म्हणून मी बघतो आहे. शिक्षण क्षेत्रातील अतिशय धाडशी बातम्या त्याने त्या काळात केल्या होत्या. एका दुष्काळी तालुक्यातून येऊन मुंबइत तो चांगला पत्रकार म्हणून गाजला. अतिशय धाडशी पत्रकार आहे.  अशा एका चांगल्या तरुण धडपड करणाऱ्या पत्रकाराला जर एक मंत्री खोटे गुन्हे दाखल करून संपवणार असेल तर हे भयचकित करणारे आहे..

मला आता आत्महत्या करावी वाटते असे तुषार त्या video त म्हणतो.अशावेळी सर्वांनी एक मोहीम चालवून तुषारच्या पाठीशी उभे राहावे अन्यथा या सुड घेण्याची क्रूर पद्धत असे अनेक पत्रकार संपवून टाकेल. राज्यातील सर्व पत्रकारांनी आता सरकारला जाब विचारण्याची गरज आहे. .बातमी केल्यावर इतर गुन्हे लगेच कसे काय दाखल होतात हे विचारण्याची गरज आहे...
हेरंब कुलकर्णी

.............,.....................................,........................

‘लय भारी’ या न्यूज पोर्टलचे संपादक तुषार खरात यांना मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून खंडणीच्या आरोपाखाली दहिवडी पोलिसांनी जिल्हा सातारा येथे अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर अन्य एका तक्रारीनुसार वडूज येथे अ‍ॅट्रोसिटी आणि इतर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरात यांच्यावरील दाखल गुन्ह्यांमध्ये कायदेशीर कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य काय ते बाहेर येईलच. मात्र, खरात यांच्यावरील आरोपांचा शहानिशा व तपास करण्याआधीच त्यांना ताब्यात घेण्याची पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता खेदजनक आणि निषेधार्ह आहे. जयकुमार गोरे यांच्याविषयी दिल्या जाणार्‍या बातम्या थांबवण्यासाठी खरात यांना अटक करून मुस्कटदाबी करण्याचे हे प्रयत्न असल्याचे खरात यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालून या प्रकारची ही मुस्कटदाबी थांबवावी, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघ करत आहे.


अट्रोसिटी ॲक्ट:खैरलांजीचा आणि साताऱ्याचा !

भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीत भय्यालाल भोतमांगे या बौद्धाचे अख्खे कुटुंब संपवून टाकण्यात आले. ते हत्याकांड क्रौर्याचा, रानटीपणाचा कळस गाठणारे होते. त्यामागे दडलेला दलित द्वेष किती टोकाचा असेल,हे वेगळे सांगण्याची गरज नाही.तरीही त्या प्रकरणात आरोपींना अट्रोसिटी ॲक्ट लागला नव्हता! मुळात अट्रोसिटी ॲक्टखाली कारवाई करण्यास पोलीस एरवी नाखूष असतात. दलित तक्रारदारांची त्यांनी धुडकावून लावलेली अशी शेकडो प्रकरणे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे नेते वैभव गीते आणि ॲड. केवल उके हे एकाच बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगू शकतील.

राज्यातील परिस्थिती अशी असताना एका मंत्र्याने ' ढाल ' म्हणून पुढे केलेल्या दलित सहकाऱ्याच्या तक्रारीवरून तुषार खरात या पत्रकारावर अट्रोसिटी ॲक्टखाली कारवाई करण्यासाठी सातारा पोलिसांनी दाखवलेली तत्परता चकित करून टाकणारी आहे.  भय्यालाल भोतमांगे यांच्या कुटुंबांच्या हत्याकांडाला ' अट्रोसिटी ' न मानण्याइतपत कायदा बोथट आणि संवेदनाशून्य झाला होता. तर, मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकाऱ्याची तक्रार अपमानकारक टिप्पणीची असताना कायदा तिथे भलताच धारदार आणि संवेदनशील झाल्याचे दिसत आहे. कायद्याच्या अंमलबावणीच्या पातळीवरील अशा तफावतीमुळे आणि पक्षपातामुळेच खैरलांजीत ओबीसी आरोपींचे क्रौर्य हे ' अत्याचार ' ठरत नसते; पण त्याचवेळी एक ओबीसी पत्रकार मात्र एका अपमानकारक टिप्पणीच्या तक्रारीवरून ' अट्रोसिटी ॲक्ट ' खाली कारवाईला पात्र ठरतो !तुषार खरात हा पत्रकार फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांची कास धरणारा आहे हे विशेष !

∆ *दिवाकर शेजवळ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com