टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईने रामदास पी. एस. या दलित पीएचडी संशोधक विद्यार्थ्याला निलंबित केलेले आहे. भाजपच्या केंद्र सरकारवर टीका केल्याबद्दल आणि नवीन शिक्षण धोरणविरोधी आंदोलनात घेतलेल्या सहभागाबद्दल रामदासला निलंबित केले गेले. या बेकायदेशीर निलंबन कारवाईचा निषेध करण्यासाठी, शिक्षण क्षेत्रातील लोकशाही व स्वातंत्र्य रक्षणासाठी तसेच रामदासच्या समर्थनार्थ बुधवारी २६ मार्चला सायंकाळी ४.३० वाजता मुंबईत टीआयएसएसच्यासमोर जन आंदोलन करण्यात येणार आहे. यात विद्यार्थी, युवा, महिला, शिक्षक, लेखक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समिती तर्फे शैलेंद्र कांबळे, सुबोध मोरे, रोहिदास जाधव, प्रिती शेखर, महेंद्र उघडे यांनी केले आहे.
रामदास हा दलित कुटुंबातील त्याच्या पहिल्या पिढीतला पीएचडी स्कॉलर आहे. त्याने टीआयएसएसच्या एमए प्रवेश पूर्व परीक्षेत टॉप केलेले आहे. तसेच यूजीसी-नेट उत्तीर्ण करून अनुसूचित जातीसाठी असलेली राष्ट्रीय फेलोशिप मिळवलेली आहे. एक चांगला विद्यार्थी म्हणून रामदासचा रेकॉर्ड आहे. तो स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चा केंद्रीय कार्यकारी समितीचा सदस्य असून प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) या टीआयएसएसमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थी संघटनेचा प्रमुख नेता आहे. मागच्या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये, निलंबन कारवाई झाल्यानंतर रामदासने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि टीआयएसएसच्या बाजूने निर्णय दिला. एखादा विद्यार्थी जर सरकारच्या चुकीच्या शिक्षण धोरणाविरोधात बोलत असेल तर त्याला जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. रामदास हा राष्ट्रीय फेलोशिप मिळवलेला संशोधक आणि विद्यार्थी कार्यकर्ता आहे.त्याच्यावर आरोप केले गेले की, त्याने दिल्लीत शैक्षणिक धोरणाविरोधात झालेल्या मोर्चात सहभाग घेतला. फेलोशिप घेणारा विद्यार्थी हा सरकारच्या विरोधात बोलू नये. 'देश वाचवा, भाजपला नकारा', अशी घोषणा त्याने देऊ नये. हे कृत्य म्हणजे देशविरोधी आहे, असं टीआयएसएसचं म्हणणं आहे. टीआयएसएस असे बोलून संविधानाची पायमल्ली करत आहे. टीआयएसएसच्या अशा वर्तनाचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या संघर्षात उतरावे, या आंदोलनात रामदासवर झालेल्या निलंबन कारवाईचा निषेध केला जाईल. तसेच या आंदोलनात पुढील मागण्या केल्या जाणार आहेत: रामदासची फेलोशिप अडवण्यात येऊ नये. दलित कुटुंबातील विद्यार्थ्यासोबत अशा प्रकारचा भेदभाव करणे त्वरित थांबवावे. टीआयएसएसने लोकशाहीला दडपून टाकण्याचे प्रयत्न थांबवावेत. शिक्षण क्षेत्रातील लोकशाही आणि स्वातंत्र्याचे रक्षण अबाधित ठेवावेत.
या जन आंदोलनात डावे, आंबेडकरी, लोकशाहीवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी संघटना, कार्यकर्ते आणि लेखक सहभागी होणार आहेत. तसेच स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), जाती अंत संघर्ष समिती, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया, दलित पँथर, अ. भा. दलित अधिकार आंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, अ. भा. जनवादी महिला संघटना, छात्र भारती, संविधान संवर्धन समिती, राष्ट्रीय बहुजन महासंघ, नारी अत्याचार विरोधी मंच, भारतीय महिला फेडरेशन, फॉरवर्ड ब्लॉक, भागवत जाधव स्मृती केंद्र, प्रागतिक रिपब्लिकन पक्ष, खोरीप, भारतीय मजूर कष्टकरी महासंघ, दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती, आंबेडकर-फुले-पेरियार स्टडी सर्कल आयआयटी मुंबई, दिशा विद्यार्थी संघटना, मुंबई कलेक्टीव, जन हक्क संघर्ष समिती या पक्ष व संघटना सहभागी आहेत. असे आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
- शैलेंद्र कांबळे - 9821660725
- सुबोध मोरे - 9819996029
- रोहिदास जाधव - 8806445977
- महेंद्र उघडे - 9967310702
0 टिप्पण्या