नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे एक राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून ईडी ही मोदी शाह यांची वसूली गँग आहे आणि त्यांच्या तथाकथित आरोपपत्राला काँग्रेस भिक घालत नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड, प्रवक्ते चरण सपरा, सुरेशचंद्र राजहंस, निजामुद्दीन राइन, आनंद शुक्ला, बब्बू खान व अर्शद आझमी आदी उपस्थित होते.
पवन खेरा यांनी ईडी कारवाईवर भाजपा सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड ही संस्था ना नफा तत्वावरील असून या संस्थेच्या माधम्यातून कोणताही आर्थिक लाभ झालेला नाही, संस्थेतून एक पैसा किंवा मालमत्ता हस्तांतरित केलेली नाही तरीही मनी लाँडरिंगचे आरोप लावले आहेत. बॅलन्स शीट कर्जमुक्त करण्यासाठी कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर केले जाते. ही एक सामान्य पद्धत आहे आणि पूर्णपणे कायदेशीर आहे. जेव्हा पैसेच नसतील, तेव्हा लाँडरिंग कुठे आहे? मोदी सरकारने ईडीला आपला निवडणूक विभाग (Election department ) बनवले आहे आणि विरोधकांवर वारंवार सूड घेण्यासाठी त्याचा गैरवापर करत आहे. ईडी प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त १% आहे. ईडीने नोंदवलेल्या राजकीय प्रकरणांपैकी ९८% प्रकरणे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आहेत. भाजपा सरकारने आम्हाला कितीही गप्प करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. जे इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात ते स्वतः घाबरतात. हे एक राजकीय षड्यंत्र आहे आणि काँग्रेस पक्ष त्याचा सामना करेल शेवटी विजय सत्याचा विजय होईल, असेही पवन खेरा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रॅम्प यांना जेवढे घाबरतात तेवढेच ते वस्तुस्थितीला घाबरतात. ९ एप्रिल पर्यंत जर आरोपपत्र दाखल केले नसते तर हे प्रकरण संपले असते म्हणून शेवटच्या दिवशी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात काय आहे ते आम्हाला माहित नाही पण या प्रकरणात खरेच घोटाळा असता तर मोदी सरकार ३६५ दिवस गप्प बसले नसते, लगेच काँग्रेसच्या नेत्यांची परेड काढली असती. ईडी कसे काम करते हे दशाने पाहिले आहे. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारमध्ये आज जे अर्थमंत्री आहेत त्यांच्यावर पंतप्रधान मोदींनीच ७० हजार कोटी रुपयांचा आरोप केला होता आणि त्याच व्यक्तीला सत्तेत सहभागी करून तिजोरीच्या चाव्या हाती दिल्या, असेही पवन खेरा म्हणाले.
0 टिप्पण्या