ठाणेकरांना जलद गतीने आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून काही वर्षापूर्वी महानगरपालिकेने टू-व्हीलर अॅम्बूलन्सचा प्रस्ताव पारित केला. याद्वारे अत्याधूनिक ३० टू-व्हीलर खरेदी करण्यात आल्या. अॅव्हेन्जर मॉडेल असणाऱ्या या टू-व्हीलरची त्यावेळेची किंमत सुमारे ७० हजार रूपये होती. अशा ३० गाड्या घेऊन त्यांचे मॉडीफिकेशन करण्यात आले. त्यांना टू-व्हीलर अॅम्बूलन्सचे स्वरूप देण्यात आले. ज्यामध्ये गाडीवर मागे प्राथमिक उपचाराची सुविधा असलेला बॉक्स तसेच बाजूला ऑक्सीजनची सुविधा ठेवण्यात आली आहे. असे मॉडीफिकेशन करण्यासाठी सुमारे १४ लाखाचा खर्च करण्यात आला. असा एंकदरीत सुमारे ४५ लाखाहून अधिक खर्च या टू-व्हीलर अॅम्बूलन्ससाठी करण्यात आला. मात्र या टू-व्हीलर अॅम्बूलन्सचा कोणताही उपयोग महापालिकेने केला नसल्याने या गाड्या अद्यापही पार्किंग प्लाझा या ठिकाणी धूळखात पडलेल्या असल्याची बाब शिवसेनेचे प्रवक्ते अमिष गाढवे यांनी ठाणेकरांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी समस्या नेहमीचीच आहे. यावर पर्याय म्हणून ही टू-व्हीलर अॅम्बूलन्स सेवेची सूपिक कल्पना मांडली गेली. जेणेकरून या टू-व्हीलर अॅम्बूलन्सला रुग्णाला सहजतेने जवळच्या रुग्णालयात नेता येईल. असे ठाणेकरांना सांगून हा टू-व्हीलर अॅम्बूलन्स प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला खरा मात्र अगदी नव्या-कोऱ्या या गाड्या अल्पावधितच पार्किंग प्लाझामध्ये उभ्या राहिल्या. कारण कोणतेही नियोजन न करता पालिकेने हा प्रकल्प राबवण्याची घिसाडघाई केली. या गाड्या चालवणार कोण? या गाड्या कोण-कोणत्या रुग्णालयाकरिता उपलब्ध करून देण्यात येणार? अशा कोणतेही नियोजन नसल्याने या नविन मॉडीफिकेशन केलेल्या गाड्या थेट पार्किंग प्लाझा मध्ये उभ्या करण्यात आल्या. त्या अद्यापही याच ठिकाणी धूळखात पडून आहेत. आता या टू-व्हीलर अॅम्बूलन्सची अवस्था अतिशय खराब झाली असून त्या चालण्याच्या स्थितीतही नाहीत. अर्ध्या गाड्यांचे तर महत्त्वाचे पार्ट्स देखील गायब झाले आहे. केवळ दोन चाकांवर उभ्या असलेल्या या गाड्या भंगारमध्ये विकण्याखेरीज महापालिकेकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. ठाणे म्हणजे सरकारचे सध्याचे केंद्रबिंदू आहे, असे म्हटले तर वावग ठरू नये, या महाराष्ट्रात झालेला राजकारणाचा चिखल सर्वांनी पाहिलेला आहे. त्या चिखलाचं केंद्रबिंदू आहे ठाणे. आणि या ठाण्यामध्ये काय काय घोटाळे होत आहेत हे या टू-व्हीलर अॅम्बूलन्सवरून दिसून येते. या गाड्यांचे आता काय करायचे ते महापालिकेने लवकरात लवकर करावे. या गाड्या किमान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना तरी वापरायला द्याव्यात. जेणेकरून त्यांना देण्यात येणारे इतर भत्ते तरी वाचतील. कुठेतरी या गाड्यांचा उपयोग झालाच पाहिजे. ठाणेकरांच्या कररूपी पैशाची अशी वाताहत करण्याचा महापालिकेला काय अधिकार आहे. याबाबत पालिकेला जाब विचारणे गरजेचे आहे. मात्र ठाण्यात जो प्रश्न विचारतो त्याच्यावर दबावतंत्राचा वापर करून त्याला गप्प करण्यात येते. कारण ठाणे हे काही राजकारण्यांचे केवळ सत्ता केंद्र आहे. तेव्हा ठाणेकरांनो आता तरी उघडा डोळे आणि बघा नीट. स्मार्ट सिटीच्या वल्गना करणाऱ्यांना विचारा हीच आहे ती स्मार्ट सिटी- अनिश गाढवे (प्रवक्ते-शिवसेना ठाणे)
0 टिप्पण्या