बहुजनांची संस्कृती आणि अभिव्यक्ती नाकरणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करण्यात यावे असा एकमुखी ठराव आज मुंबईत झालेल्या सेन्सॉर बोर्ड विरोधी राज्यस्तरीय परिषदेत संमत करण्यात आला. लोकांचा सिनेमा चळवळ आणि विविध जनसंघटनांच्या वतीने आज ९ एप्रिल रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आली होती.या परिषदेला महाराष्ट्राच्या विविध भागातून नाट्य चित्रपट कलावंत,विचारवंत, साहित्यिक,पत्रकार,वकील,विद्यार्थी उपस्थित होते.याच ठिकाणी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चल हल्ला बोल या मराठी चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल दाखविण्यात आला.
चल हल्ला बोल या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक महेश बनसोडे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.या परिषदेला ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले,प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अविनाश दास,लोकांचे दोस्त रवि भिलाणे,कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठल लाड,अभिनेत्री प्रतिभा सुमन शर्मा,पँथर सुमेध जाधव, डॉ.स्वप्नील ढसाळ,डॉ.संगीता ढसाळ आदींनी संबोधित केले.ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे यांनी ठरावाचे वाचन केले तर ज्योती बडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी प्रतिभा सुमन यांच्या बहुजन आपका अपना ओटीटी प्लॅटफॉर्मचे उदघाटन केले गेले.यावेळी बोलताना निरंजन टकले म्हणाले की,अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक मार्गाने हल्ले होत आहेत.ते रोखायचे असतील तर आपणही नवनवे पर्याय वापरून ते रोखले पाहिजेत.मिळेल त्या साधनानिशी लोकांना सत्य सांगितले पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार राहिले पाहिजे.अविनाश दास म्हणाले की द्वेषाच्या या वातावरणात चित्रपट माध्यमातून प्रेम पसरवलं पाहिजे. प्रेमाचे उत्तर प्रेमच असेल.द्वेष नाही असू शकत.आजची परिषद ही देशात वाढत असलेल्या सर्व तऱ्हेच्या सेन्सॉरशिप विरुद्ध आवाज उठवणारी परिषद असल्याचे रवि भिलाणे यांनी मांडले.आपण पहात असलेले सेन्सॉर हटावचे स्वप्न एक दिवस नक्की सत्यात उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिषदेच्या आयोजनात रवि भिलाणे, पत्रकार संजय शिंदे, पँथर सुमेध जाधव, कॉम.सुबोध मोरे, पँथर स्वप्नील ढसाळ, कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठल लाड, ज्योती बडेकर, अभिनेत्री प्रतिभा शर्मा, संगीता ढसाळ, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.
- दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या सेन्सॉर बोर्ड विरोधी राज्यस्तरीय परिषदेत सर्वानुमते पुढील ठराव संमत करण्यात आले
- १ ) भारतीय स्वातंत्र्यापासून आजतागायत ब्राम्हणी,भांडवली विचारधारेच्या जोपासने करिता कार्यरत असणाऱ्या तसेच बहुजनांची अभिव्यक्ती आणि संस्कृती नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा ही परिषद निषेध करत आहे.
- २ ) महाकवी,पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संदर्भात कोण आहेत नामदेव ढसाळ ? असा उर्मट,उद्धट आणि अपमान जनक सवाल करणारे सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी आणि सेन्सॉर बोर्ड यांचा ही परिषद निषेध करत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत आहे.
- ३ ) सर्वसामान्य निर्माते,लेखक,दिग्दर्शक यांच्या चित्रपटांना जाणूनबुजून भरमसाठ व अनावश्यक कट सुचवून त्यांची कोंडी करण्याचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी ही परिषद बांधील असून चल हल्ला बोल सारख्या सर्वच चित्रपटांचा प्रदर्शनासाठीचा मार्ग मोकळा होण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी ही परिषद करत आहे.
- ४ ) जगातील अनेक देशात सेन्सॉर बोर्ड राहिले नाही.शिवाय नव्या तंत्रज्ञानात ओटीटी,मोबाईल आणि एआय सारख्या गोष्टींमुळे मुळे सेन्सॉर बोर्ड ही संकल्पनाच कालबाह्य ठरली आहे.आणि म्हणून केवळ बहुजन अभिव्यक्ती आणि संस्कृतीची गळचेपी करणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा असा ठराव या परिषदेत करण्यात येत आहे.
- ५ ) आज देशात देव,धर्म,इतिहास आदी विषयांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने,वेगवेगळ्या तऱ्हेची अघोषित पण खुलेआम जाणवणारी सेन्सॉरशिप लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशा कोणत्याही तऱ्हेच्या सेन्सॉरशिपला ही परिषद आपला जाहीर विरोध प्रदर्शित करत आहे.
लोकांचा सिनेमा चळवळीस ब्लॅक पँथर (पक्ष) चा जाहीर पाठिंबा!
ब्लॅक पँथर (पक्ष), अजय म कांबळे, मुंबई प्रदेश व पुणे जिल्हा निरीक्षक तसेच कल्याण तालुका महिला आघाडी अध्यक्षा मालिनी कोविदरत्न यांनी चल हल्ला बोल या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते महेश बनसोडे यांना ब्लॅक पँथर (पक्ष) च्या लोकांचा सिनेमा चळवळीस जाहीर पाठिंब्याचे पत्र सर्व उपस्थितांसमोर दिले व या लढ्यामध्ये ब्लॅक पँथर (पक्ष) सहभागी असल्याचे आश्वासन दिले.. सेन्सॉर बोर्डाच्या पक्षपाती पणाचा ब्लॅक पँथर (पक्ष) तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या