ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी
August 8, 2020 • JANATA xPRESS

एसटी कर्मचा-यांचे  जून पर्यन्तचे उर्वरित वेतन अदा करून परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करा - वंचित बहुजन आघाडी.

मुंबई

आघाडी सरकारने जाणीवपूर्वक बंद ठेवलेल्या राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवेच्या एसटी कर्मचा-यांना जून पर्यंतचे वेतन अदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आणि  कर्मचा-यांच्या आत्महत्येचे सत्र पाहता उर्वरित वेतन तात्काळ अदा करून पूर्ण क्षमतेने परिवहन सेवा सुरु करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. 

गेले चार महिने सरकारने एसटीचे चाक रुतवून ठेवले आहे. त्यातच कंत्राटी सेवा देणारे कर्मचारी कमी करण्याचे व सक्तीने सेवा निवृत्ती देण्याचा सपाटा सरकारने सुरु केला होता. कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडले जात आहे. गेले चार महीने अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन देण्याची उपाययोजना आखण्याची तसदी देखील सरकार घेत नव्हते. तोटा वाढल्याने महामंडळाची आर्थिक अवस्था बिकट झाली हे कारण सांगून एसटी कर्मच-यांना वेठीस धरले जात आहे.त्यातच ९० हजार कर्मचाऱ्यांना २० दिवस सक्तीच्या रजेवर जाण्याचे तुघलकी आदेश काढण्यात आले होते. मुंबई, पुणे, पालघर, सोलापूर, अहमदनगर, रायगड,  जिल्ह्यातील विभाग नियंत्रकांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाने मागील महिन्यात दिले होते. मार्च महिन्याचा २५ टक्के, मे महिन्याचा पन्नास टक्के पगार दिला नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.आर्थिक विवंचनेतून आत्महत्या सत्र सुरु झाले होते. त्याविरुद्ध एसटी कर्मचारी संघटना व वं.ब.आ.ने वेतन अदा करण्याची मागणी करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

त्यावर सरकारने काही कोटीची तुटपुंजी आर्थिक तरतूद जाहीर केली होती. आज सरकारने एसटी कर्मचारी यांचा मार्च महिन्याचा उर्वरित २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के व जून महिन्याचे पूर्ण वेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जुलै महिन्याचे वेतन अधांतरी आहे. कुठल्याही शासकीय कर्मचा-यांचे वेतन अश्या पद्धतीने रोखण्यात आले नाही. कुटुंबाचे उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि इतर जबाबदा-या पाहता एसटी कर्मचा-यांना जुलै महिन्याचे पूर्ण वेतन तात्काळ अदा करण्यात यावे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मग एसटी का बंद आहे, असा सवाल करीत एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे, तसेच कर्मचारी कपात, सक्तीची सेवा निवृत्ती, सक्तीने रजा या अघोरी व अनुचित कामगार प्रथा बंद करावी, अशी मागणी व.ब.आ.चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.