ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
केवळ बाधित असलेला मजला सील करण्याचा नवा अध्यादेश
May 25, 2020 • JANATA exPRESS

शहरामध्ये जवळपास 600 पेक्षा जास्त कोव्हीड वॅारियर्स गस्तीवर

केवळ बाधित असलेला मजला सील करण्याचा नवा अध्यादेश

ठाणे

ठाण्यातील झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठामपाची चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळे झोपडपट्टी भागात कोरोनाचा संसर्ग कसा आटोक्यात आणायचा असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.  झोपडपट्टीत हा प्रश्न गंभीर झाला असला तरी इमारतींमध्येही कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. एखाद्या इमारतीमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर ती संपूर्ण इमारत सील करण्याबरोबरच 500 मीटर पर्यंतचा परिसर देखील सील केला जात होता. मात्र अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी गैरसोय निर्माण होत असल्याने आता ज्या इमारतीच्या मजल्यावर कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे केवळ तेवढाच मजला सील करण्याचा नवा अध्यादेश ठाणे महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे. झोपडपट्टीबाबत मात्र अद्याप कोणत्या ही प्रकारचे आदेश काढण्यात आलेले नाहीत.

तसेच नौपाडा कोपरी प्रभाग समितीतंर्गत नागसेन नगर, खारटन आणि चेंदणी कोळीवाडा येथे  कोव्हीड 19 ची बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार आता नागसेननगर आणि खारटन रोड येथे कोव्हीड वॅारियर्स नेमण्यात आले आहेत.  शहरामध्ये जवळपास 600 पेक्षा जास्त कोव्हीड वॅारियर्स गस्तीवर आहेत.  महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोव्हीड वॅारियर्स  नेमून त्यांच्यामार्फत नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, त्या परिसरात कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का याची माहिती घेवून त्यांना तेथील फिव्हर ओपीडीमध्ये जाण्यास प्रवृत्त करणे आदी कामगिरी करवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर परिमंडळ उपायुक्त संदीप माळवी आणि नौपाडा-कोपरी सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, कार्यकारी अभियंता प्रदीप घाटगे यांनी नागसेननगर, खारटन रोड येथे भेट देवून या सर्व कोव्हीड वॅारियर्सना आवश्यक त्या सूचना दिल्या.