ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
कोरोना लढाईत नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्यावे - मुख्यमंत्री
July 9, 2020 • JANATA xPRESS

कोरोना लढाईत नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्यावे - मुख्यमंत्री

मुंबई

ठाणे जिल्ह्यात कोरोनाची वाढती साथ चिंताजनक आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे कोविड रुग्णालयांसाठीच्या सुविधा ताडीने उभारा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. त्याचवेळी आयुक्तांना स्पष्ट बजावले आहे, कोरोनाशी लढाई एकांगी नको, पालिकांनी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करुन घ्यावे. आपापल्या शहरांतील नागरिकांना, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करुन घ्या जेणे करुन या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. त्यांनी गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला आणि महत्वाच्या सूचना केल्या.

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी देखील सर्व आयुक्तांना कोरोनाचा संसर्ग कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सांगितले. या तीन चार महिन्यांच्या लढाईत काय करावे आणि काय करु नये याविषयी सर्वांना पुरेशी माहिती झाली आहे. तसेच सर्व सूचना आणि निर्देश स्वयंस्पष्ट असतात. याप्रमाणे सर्व आयुक्तांनी अधिक बारकाईने लक्ष घालून कारवाई केली तर आपल्याला अपेक्षीत यश मिळेल अशी मला खात्री आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मार्चपासून जुलैपर्यंतच्या कालावधीत आपण जम्बो सुविधा उभारण्यावर भर दिला. मुंबईमध्ये ज्या रीतीने या सुसज्ज सुविधा निर्माण झाल्या आहेत तशा त्या महानगर क्षेत्रातही होणे अपेक्षित होते आणि वारंवार तशा सूचना देण्यात आल्या होत्या, पण पाहिजे तेवढ्या सुविधा उभारलेल्या दिसत नाहीत. येणा-या काळात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने अजूनही या सुविधा प्रत्येक पालिका क्षेत्रात उभारणे सुरु करा. यात मोठे उद्योग, कंपन्या, संस्था यांची देखील मदत घ्या. मुंबईतील सुविधा म्हणजे जागा दिसली आणि उभारले तंबू अशा नाहीत. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ड्रेनेज, शौचालय, पिण्याचे पाणी या सोयी आहेत. आयसीयू, डायलेसिस सुविधा आहेत. पालिकांनी आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले

कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाड्या आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था , युवकांना यात सहभागी करून घ्या. ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध नागरिक यांना दुसरे काही आजार आहेत का तसेच त्यांची ऑक्सिजन पातळीबरोबर आहे का, परिसरात कुणाला काही आजार आहेत का, स्वच्छता नियमित केली जाते का, लोक मास्क घालतात का, या तसेच इतर अनेक बाबतीत या नागरिकांच्या समित्याची आपणास मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.