ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
जितो ट्रस्ट-एमसीएचआयने उभारलेल्या निधीचा हिशोब जाहीर करा
August 4, 2020 • JANATA xPRESS

विशेष कोविड रुग्णालयावर महापालिकेने आतापर्यंत किती खर्च केला, ते जाहीर करावे.

ठाणे

विशेष कोविड रुग्णालयात १०२४ रुग्ण क्षमता असताना केवळ ३३० रुग्णांना दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी जितो ट्रस्ट-एमसीएचआयला निधी उभारण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली होती. या निधीचा हिशोब जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत ठाणे महानगर पालिकेकडून विशेष कोविड रुग्णालयाचे नियोजन खासगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव असून कंपनीला प्रती बेड दररोज ५०० ते १५०० रुपये देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे चर्चा ठाण्यात रंगली आहे. याबाबत भाजपने आक्षेप घेतला असून कोरोना नियंत्रणात आणायचाय कि महापालिकेची तिजोरी रिकामी करायची आहे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय वाघुले यांनी केला आहे.  डॉक्टर, नर्ससह वैद्यकिय कर्मचाऱ्यांची नियुक्ती खाजगी कंपनी करणार आहे. एकीकडे महापालिकांना मनुष्यबळ मिळत नसताना कंत्राटदाराला कर्मचारी कोठे मिळणार असा सवाल करीत निविदा रद्द करण्याची मागणी वाघुले यांनी केली आहे.

 महापालिकेकडून प्रतिदिन सामान्य कक्षासाठी ५०० रुपये, ऑक्सिजन उपलब्ध बेडसाठी ७५० रुपये आणि आयसीयूतील बेडसाठी १५०० रुपये दिले जाण्याबाबत विचार सुरू आहे. १०२४ बेडच्या रुग्णालयातील ५०० बेडवर ऑक्सिजन सुविधा आहे. तर आयसीयूत ७६ बेड असून, त्यातील ५० सुरू आहेत. त्यामुळे दररोज कंत्राटदाराला लाखो रुपये शुल्क मिळणार असल्याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. शहरातील खाजगी रुग्णालये लाखो रुपये उकळत असतानाही विनामूल्य कोविड रुग्णालयात केवळ ३३० रुग्ण दाखल आहेत. विशेष कोविड रुग्णालयावर महापालिकेने आतापर्यंत किती खर्च केला, ते जाहीर करावे. तसेच कोविड रुग्णालयाच्या नियोजनाबाबत काढलेली निविदा रद्द करुन महापालिकेमार्फतच रुग्णालयाचा कारभार चालवावा अशी मागणीही वाघुले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेचा खुलासा
पीपीई किटस् खरेदी, नर्सेसची भरती तसेच ठाणे कोविड हॉस्पिटल एका कंपनीस चालविण्यास देण्याच्या पाश्वभूमीवर केलेले आरोप निराधार आणि महापालिकेचे बदनामी करणारे आहेत असा खुलासा ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आला आहे. अडीच महीने जुनी असलेल्या कंपनीला ठाणे कोविड रुग्णालय चालविण्यास देण्याबाबत त्यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना महापालिकेने याबाबत विहित कार्यपध्दती अवलंबून अटी आणि शर्तीचे पालन करणऱ्या पात्र कंपनीला हे काम दिले आहे. त्याचबरोबर ही कंपनी मुंबईमध्ये जवळपास 20 कोविड हॉस्पिटलमध्ये अशी सुविधा देत आहे. मुळातच कोविड हा साथ आजार नवीन असल्याने त्यासाठी 3 वर्ष जुने कंपनीचा अनुभव गृहित धरणे अभिप्रेत नाही असे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्नांना चांगले उपचार देता यावेत, प्रभावी व्यवस्थापन व्हावे तसेच मृत्यूदर कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
      पीपीई किटस् च्या बाबतीत त्यांनी केलेले आरेाप निराधार आहेत हे स्पष्ट करताना महापालिकेने विहीत कार्यपध्दती अवलंबूनच पीपीई किटस खरेदी केले आहेत. तसेच त्याचे नमुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तज्ञ समितीने तपासल्यानंतरच अंतिम करण्यात आले आहेत असे सांगितले. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे देयक अदा करण्यात आले नाहीत.  नर्सेसच्या नियुक्तीबाबतही महापालिकेने आपले धोरण स्पष्ट केले असून त्यांच्यावर कुठलाही अन्याय केलेला नाही असे सांगितले. मुलत: त्यांची नियुक्ती ही केवळ कोविड पुरतीच मर्यादित असून त्यांना मानधनावर घेण्यात आले आहे. सदरचे रुग्णालय आता दुसऱ्या कंपनीला व्यवस्थापनासाठी दिले असल्याने त्यांना त्यांच्या आस्थापनेवर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.