ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
डोंबिवली शीळ मार्गावरील निळजे पुल वाहतूकीसाठी येत्या दहा दिवसात सुरू
June 30, 2020 • JANATA xPRESS

डोंबिवली शीळ मार्गावरील निळजे पुल वाहतूकीसाठी येत्या दहा दिवसात सुरू

कल्याण
डोंबिवली शीळ मार्गावरील निळजे पुलावरील वाहतूक येत्या दहा दिवसात सुरू करण्यात येईल. हलक्या वाहनांना या पुलावरुन जाण्यास परवानगी असेल. अवजड वाहनांची वाहतूक मात्र तळोजामार्गे वळवण्यात येणार आहे. १५ जूनपासून निळजे पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. आयआयटीच्या अहवालानंतर याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. शीळ फाटामार्गे ठाणेनवी मुंबईपनवेलपुणे या परिसरात जाणाऱ्या वाहनांना निळजे पुलावरील वाहतूक बंद झाल्याचा फटका बसला आहे.  कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज पुलाच्या कामाची पाहणी केली.

 मागील आठवड्यात राज्य रस्ते विकास महामंडळाने पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले होते. ३० जुनपासून रेल्वेच्या हद्दीतील कामाची सुरुवात करण्यात येईल. एका आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पुलाच्या चार गर्डर पैकी दोन गर्डरच्या बळकटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर पुलाची चाचणी घेऊन हलक्या वाहनांसाठी पुलावरील वाहतूक खुली करण्यात येईल. पुलाच्या इतर दुरुस्तीच्या कामांची पाहणीही यावेळी करण्यात आली. या पुलावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक तळोजामार्गे वळवण्यात येणार आहे. यामुळे हलक्या वाहनांना वाहतुक कोंडीचा फटका बसणार नाही अशी अपेक्षा आहे.यावेळी विभागीय अभियंता मध्य रेल्वे हिव्हाळे, ट्राफिक पोलीस उपायुक्त अमित काळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सोनटक्के हे उपस्थित होते.