ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
तर कदाचित वेगळी भूमिका घेतली असती - बाळासाहेब थोरात
May 10, 2020 • JANATA exPRESS

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध?

मुंबई 

   तर कदाचित वेगळी भूमिका घेतली असती - बाळासाहेब थोरात

आघाडीच्या सहा जागा निवडून येऊ शकल्या असत्या, पण राज्यात कोरोनाचे संकट असताना निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्व आमदारांना मतदानासाठी
मुंबईत आणनेही अडचणीचे होते. कोरोनाचे संकट नसते, किंवा स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार नसते तर कदाचित वेगळी भूमिका घेतली असती, असे महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दोन उमेदवार जाहिर करण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या विनंतीनंतर एक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यावेळी थोरात यांनी आपले मत व्यक्त केले. 

भाजपने चार उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोर्‍हे, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादीचे माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी हे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्याने शिवसेनेची धावपळ उडाली होती. परंतु अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती व भविष्यातील वायद्यानंतर काँग्रेसने एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 विधानसभेतील संख्याबळानुसार सत्तारूढ आघाडीच्या 5 व भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. नवव्या जागेसाठी चुरस होती. नववी जागा जिंकण्यासाठी आघाडी व भाजप या दोघांनाही बाहेरून चार मतं मिळवावी लागणार होती. भाजपाच्या चार उमेदवारांनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागा लढवणार आहे. काँग्रेसने एकच उमेदवार देणे अपेक्षित होते. दुपारी केवळ राजेश राठोड यांच्याच उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. परंतु रात्री उशिरा अचानक काँग्रेसने अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांची उमेदवारी जाहीर करून गोंधळ उडवून दिला होता. काँग्रेसने एकच उमेदवार उभा करावा यासाठी शिवसेना नेत्यांकडून आज सकाळपासूनच काँग्रेसची मनधरणी सुरू होती. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही महसूलमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विनंती केली. अखेर सायंकाळी सह्याद्री शासकीय आथितिगृहात आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर थोरात यांनी आघाडी केवळ पाच जागा लढवणार असल्याची माहिती दिली व रात्री सुरु झालेल्या नाट्यावर पडदा पडला.
 
.