ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
तानसा अभयारण्यातील भेकर शिकार प्रकरणी आणखी ५ जणांना अटक  
May 29, 2020 • JANATA exPRESS

तानसा अभयारण्यातील भेकर शिकार प्रकरणी आणखी ५ जणांना अटक  

वन्यजीव विभागाची धडक कारवाई  शिकारी टोळ्यांचे धाबे दणाणले 

शहापूर 

शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातील वेहलोंडा जवळील जंगलात भेकराची शिकार करणाऱ्या टोळीतील आणखी पाच आरोपी तानसा वन्यजीव विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या टोळीतील ३ आरोपींना यापुर्वीच तानसा वन्यजीव विभागाने अटक केली होती. तथापि टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आल्याने भेकर शिकार प्रकरणाच्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता एकूण ८ झाली आहे .वन्यजीव विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी भेकर शिकारीच्या टोळीतील या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करीत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत .

 वन्यजीव विभागाच्या या धाडसी कारवाईमुळे छुप्या पध्दतीने वन्य जीवांची शिकारी करणाऱ्या टोळ्यांचे आता धाबे दणाणले आहेत .याबाबत वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वीस दिवसांपूर्वी तानसा अभयारण्य क्षेत्रातील वेहलोंडा व खोस्ता गावानजीक परिमंडळ वेहलोंडा मधील नियतक्षेत्र खोस्ता कं.नं. ९१० मधील स्थानिक नाव डोंगर शेत या ठिकाणी भेकर वन्यजीवांची शिकार झाल्याचे आढळून आले होते तथापि या बाबत माहिती मिळताच घटनास्थळी तानसा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी वेहलोंडा परिमंडळाचे वनपाल संजय भालेराव व इतर वन्यजीव विभागाच्या सहकारी कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेत तेथे सापळा रचला. 

यावेळी भेकर शिकार प्रकरणातील आरोपी विष्णू गोपाळ गावित वय ३७ वर्ष राहणार डिंभे (अघई)  शंकर  कोडू साराई वय ४५ वर्ष राहणार (टहारपूर )अक्षय शंकर सराई वय   २० वर्ष राहणार (टहारपूर )या तीघा जणांना ताब्यात घेतले होते घटनास्थळी सदरील आरोपींकडे एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक ची गोण आढळून आली त्या मध्ये भेकर वन्यजीव प्राणी मृत अवस्थेत व रक्ताने माखलेल्या स्वरुपात मिळून आले होते. या भेकराच्या शिकार प्रकरणी घटनास्थळावरुन ३ आरोपींना अटक केली होती  दरम्यान या भेकर शिकारीच्या टोळी मध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे  याबाबत तानसा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने हे वन्यजीव विभागाचे ठाणे उपवनसंरक्षक अर्जुन.म्हसे पाटील व तानसा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डी.एल.मते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत होते

 सदर तीन आरोपींची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी  सखोल चौकशी केली असता तपासात भेकर शिकारी मध्ये आणखी पाच आरोपींची समावेश असल्याची कबुली या तीन आरोपींनी दिली .दरम्यान भेकर शिकार प्रकरणी वन्यजीव विभागाने  नामदेव सखाराम आमले वय ४७ ,विठ्ठल बाबू वाघ वय ४३ ,सुरेश सोमा वाघ वय ४५, प्रकाश बबन कामडी वय ४० , रवींद्र देहू मेगाळ वय २८ या पाच आरोपींना अटक केली आहे हे सर्व आरोपी राहणार डिंभे अघई येथील असून या सर्व आरोपींवर वन्यजीव कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अशी माहिती तानसा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी दिली .तानसा वन्यजीव विभागाच्या या धाडसी व यशस्वी कारवाईचे शहापूर तालुक्यातून कौतुक केले जात आहे .