ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
थीम पार्कमध्ये झालेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा गुलदस्त्यातच
February 21, 2020 • प्रजासत्ताक जनता

अॅम्फी थिएटरच्या घुमटासाठी १ कोटी


 ठाणे

थीम पार्कमध्ये झालेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा गुलदस्त्यातच 
अॅम्फी थिएटरच्या घुमटासाठी १ कोटी
 ठाणे
ठामपाने उभारलेल्या 16 कोटी 35 लाखांच्या थीम पार्कमध्ये झालेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा गुलदस्त्यातच आहे. `बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वावर `बॉलीवूड पार्क'चे काम देण्याचे ठरवले असताना, प्रशासकीय व राजकीय संगनमताने, त्या कामासाठी 20 कोटी 61 लाखांचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. `थीम पार्क'च्या कामासाठी 13 कोटी, तर न झालेल्या बॉलीवूड पार्क'साठी 06 कोटी रुपये अदा करण्यात आले. या प्रकल्पात  झालेल्या  गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र प्राथमिकदृष्ट्या भ्रष्टाचार व बेकायदेशीरपणा दिसत असतानाही यावर अद्यापही कारवाई  करण्यात आली नाही.
उपवन येथे उभारण्यात आलेल्या अॅम्फि थिएटरसाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च झाला असून संरक्षक भिंत, गेट अशा कामांवर त्यातले ८३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. फॅब्रिकचे छत करण्यासाठी १ कोटी ८ लाख रुपये खर्च करण्यात आले, अशी माहिती प्रशासनाने देताच महासभेमध्ये त्यास जोरदार हरकत घेण्यात आली.  छताच्या उभारणीसाठी इतका वारेमाप खर्च का करण्यात आला व दोन-चार महिन्यांतच छताची दुरुस्ती का करावी लागली, असा सवाल नगरसेवकांनी केला.
'जुने ठाणे, नवे ठाणे' या संकल्पनेवर घोडबंदर येथे उभारण्यात आलेल्या थीम पार्कमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यास जबाबदार असलेल्यांवर अजूनही ठोस कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, एवढेच उत्तर प्रशासनाने दिले. मात्र वाया गेलेल्या पैशाच्या वसुलीविषयी किंवा दंडात्मक कारवाईविषयी पालिका काय करणार, हे उत्तर गुलदस्त्यातच राहिले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही या प्रकरणी झाली होती. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली थीम पार्क योजना, विकासकाऐवजी पालिकेनेच उभारलेला तरणतलाव आणि उपवन येथे साडेतीन कोटी रुपये खर्च करून उभारलेले अॅम्फी थिएटर या योजनांमध्ये गैरव्यवहारांचे गंभीर आरोप झाले असतानाही ठाणे महापालिका प्रशासनाने त्यावरील कारवाईची कोणतीही ठोस माहिती  दिली नाही.
 महापालिकेने १७ कोटी रुपये खर्चाचा थीम पार्कचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प घोडबंदर येथे  प्रस्तावित केला होता. मात्र प्रत्यक्षात तेथे उभारण्यात आलेल्या प्रतिकृतींच्या मापांमध्ये फेरफार करत धूळफेक करण्यात आली. त्यामुळे या प्रकल्पात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज या पार्कची पुरती रया गेली असून त्याची देखाभालही होत नसल्याचे चित्र आहे. आता तर तेथे मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे या थीम पार्ककडे जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. १७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात जेमतेम चार ते पाच कोटी रुपयांचेच काम झाले होते. याप्रकरणी ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र याबाबत पुढे काहीही झालेले नाही. याप्रकरणी गुरुवारच्या सभेत माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना या कामात ११ कोटी ६७ लाख ६२ हजार रुपयांचे देयक देण्यात आले आहे, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. त्याचप्रमाणे तत्कालीन वरिष्ठ अभियंता मोहन कलाल व त्यांचे सहकारी यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी नगरसेवकांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.
वर्तकनगर क्षेत्रातील विकासक आर्थिक विवंचनेत असल्यामुळे तरणतलावाचे काम महापालिकेने करावे, अशी मागणी करण्यात आली होती व महापालिकेने तो तलाव विकसित करून विकासकाच्या ताब्यात द्यायचा, असा प्रकार कसा होऊ शकतो, असा सवाल शिंदे यांनी केला. या तरणतलावासाठी नागरिकांकडून ५०० रुपये घेण्यात आले आहेत, तेही परत करावेत. महापालिकेने चार कोटी रुपये खर्चही करायचा आणि विकासकाला टीडीआरही द्यायचा, हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यावर या विकासकाला टीडीआर देण्यात आलेला नसून तो प्रस्ताव रद्द करण्याचा प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेपूर्वीच आयुक्तांना सादर करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.