ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठामपा शाळेत व्हर्च्युअल क्लासरुम
August 20, 2020 • JANATA xPRESS

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ठामपा शाळेत व्हर्च्युअल क्लासरुम
महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन

 ठाणे
कोरोनामुळे शाळा बंद आहेत, परंतु दहावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी महापालिकेने अभिनव अशी संकल्पना सुरू करुन व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून महापालिका शाळांमधून  शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब  कुटुंबातील विद्यार्थ्यांचा निश्चितच फायदा होणार आहे. ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका व विविध सामाजिक संस्थांनी उपलब्ध करुन दिलेल्या हॅप्पीनेस किटचे वाटप करण्यात आले. या हॅप्पीनेस किटमध्ये जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी सॅनिटायजर, मास्क आदींचा समावेश आहे. या व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास यावेळी शिक्षण सभापती ‍विकास रेपाळे, उपायुक्त मनीष जोशी, शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, गटअधिकारी संगीता बामणे  आदी उपस्थीत होते.

महापालिकेने सुरू केलेल्या उपक्रमांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यावा, मोबाईल, टॅब, लॅपटॉप हे केवळ खेळण्यासाठी नसून त्याचा सदुपयोग करावे असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना बाहेर फिरताना स्वत: मास्क लावावा, सामाजिक अंतर ठेवावे, तसेच कोणीही व्यक्ती मास्क न लावता फिरत असेल  तर त्याला मास्क लावण्याबाबत जागरुक करण्याचे काम  देखील विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन महापौरांनी उदघाटनाच्या औपचारिक कार्यक्रमात केले. विद्यार्थी हे समाजाला दिशा देणारा महत्वपूर्ण घटक आहे, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच शाळा बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ठामपा शाळेत दहावीचे  शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देता यावे यासाठी व्हर्च्युअल क्लासची निर्मिती करण्यात आली असून याचा लाभ सर्व  ‍विद्यार्थ्यानी घ्यावा असे  आज २० ऑगस्ट रोजी विषणुनगर शाळा क्र. 19 मध्ये झालेल्या या कार्यक्रमात महापौर म्हणाले. यावेळी दहावीत चांगले गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.