ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- आमदार जीतेंद्र आव्हाड
May 22, 2020 • JANATA exPRESS

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- आमदार जीतेंद्र आव्हाड

मुंबई

मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे, तो धारावी पुनर्विकासाचा असेल, धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आर्थिक उलाढालीला सुरुवात होईल, व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान मिळेल. लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, अशा आशयाचं पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात केली होती.

मुंबईची कोविड कॅपिटल म्हणून धारावीची ओळख प्रस्थापित होऊ लागली आहे. कोरोनामुळे जी स्थित्यंतरे पहावयास मिळाली आहेत. त्यातील प्रमुख स्थित्यंतर ही झोपडपट्टीबहुल भागात दिसून आले. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे येथील उपचार यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडलेली दिसली. परिणामी, सर्वसामान्यांमध्ये धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण खाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुन:र्विकासाएवढी सुंदर सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही. धारावीच्या विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडलेल्या आहेत.

आजच्या स्थितीमध्ये कोरोनामुळे मुंबईचे अर्थकारण घसरलेले आहे. अशा स्थितीमध्ये धारावीच्या पुन:र्विकासाचा निर्णय घेण्यात आला किंवा त्या संदर्भातील घोषणा करण्यात आली तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हिताचे ठरणार आहे. शिवाय, आपल्या राजकीय विरोधकांना Social Impact चा मोठा दणका आपल्याला देणे शक्य होणार आहे. बांधकाम उद्योग हा असा उद्योग आहे कि ज्याच्यामध्ये कितीही घसरण झाली तर बाहेरच्या विश्वातून निधी येतो. त्यामुळे ढासळलेला आर्थिक-सामाजिक स्तर उंचावतानाच नवीन रोजगार निर्मितीदेखील करता येणार आहे. धारावीसारख्या सर्व जाती-धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो विकास महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हितावह ठरणार आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर एक बैठक आयोजित करुन धारावी पुन:र्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती आव्हाड यांनी केली आहे.