ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
बाजारपेठेतील नाल्यावरील अतिक्रमणाला कोणत्या नगरसेवकाचा आशिर्वाद
March 15, 2020 • प्रजासत्ताक जनता

बाजारपेठेतील नाल्यावरील अतिक्रमणाला कोणत्या नगरसेवकाचा आशिर्वाद

 

 


ठाणे 
अतिवृष्टीमुळे काही वर्षापूर्वी ठाण्यातील स्टेशन रोड, प्रभात सिनेमा जवळील नाल्यावरील अनधिकृत बांधकाम पडून बरेच आर्थिक नुकसान झाले.  त्यामुळे नाल्यावरील उर्वरित अनधिकृत बांधकामावर आयुक्तांनी हातोडा चालवला. शहरातील सर्व नाले अनधिकृत  बांधकामांनी मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. तरीही आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टेशन रोडच्या मुख्य बाजारपेठेतील नाल्यावर मोठ्या प्रमाणात कापड व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत.  या बेकायदेशीर दुकानदारावर कोणत्या नगरसेवकाचा वरदहस्त आहे. कोणत्या नगरसेवकाच्या आशिर्वादामुळे ही दुकाने चालत आहेत असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे. 
 नाल्यांपासून 15 मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास सरकारने मज्जाव केला आहे. मात्र, हा नियम सर्रास धाब्यावर बसवून ठाण्यातील गोल्ड (प्रभात) सिनेमाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरच दुकाने थाटलेली आहेत. काही वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे या नाल्यावर असलेली इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने पडली होती. यामुळे फार मोठी वित्तहानी झाली होती. त्याच नाल्यावर बाजारपेठेकडील बाजूस स्लॅब टाकून रेडीमेड कपड्याची दुकाने उभी राहीली आहेत. 
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील नाल्यावरील बांधकामे जमिनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु महापालिकेतील अधिकाऱ्यांनी त्याची 100 टक्के अंमलबजावणी केलेली नाही. यामागचा कर्ता करविता कोण आहे?  या दुकानदारांकडून हप्ते वसुली करून त्यांना अभय देणारे कोण आहेत. बाजारपेठेतील नाला कोणत्या नगरसेवकाच्या वरदहस्ताने बेकायदेशीर दुकानदारांनी व्यापला आहे? या मागे कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाल्यावरील दुकानांना परवानगी कशी मिळाली. कुणाच्या वरदहस्ताने ही दुकाने उभी राहिली  असा सवाल येथील परिसरात राहणारे किशोर  शेलार यांनी  केला आहे.