ALL E-पेपर Article : साहित्य Your Advertise : जाहिरात
शहापूर, मुरबाड, बदलापूरची आदीवासी कुटुंब रोजच्या कमाईपासून वंचित
May 31, 2020 • JANATA exPRESS

शहापूर, मुरबाड, बदलापूरची आदीवासी कुटुंब रोजच्या कमाईपासून वंचित

शहापूर

शहापूर, मुरबाड, बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळांनी दरवर्षी ठाण्यातील बाजारपेठ बहरत होती. यामुळे आदिवासी कुटुंबांना हक्काची आमदनी मिळत होती.  मात्र, यंदा लॉकडाऊनमुळे वाहतुकीची अपुरी साधने आणि नियमित बाजार बंद असल्याने यावेळी जांभळांचा बाजारच बंद आहे. अद्यापही जांभळं पिकून झाडालाच लगडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरीही शहापूर, बदलापूर, मुरबाडच्या काही भागातून आदिवासी बांधव जांभूळ गोळा करतात. यात मोठय़ा आकाराचा हलवा आणि छोटय़ा आकाराचा गरवा अशी जांभळांच्या प्रमुख जाती आहेत. गेल्या वर्षी जांभळाच्या १०० पाटय़ांचा व्यवसाय अवघ्या १० ते १५ पाटी प्रति दिवसांवर आला होता. यंदा तो पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र आहे. 
करोनाकाळात आदिवासींनी झाडावरची जांभळे अद्याप उतरवलेली नाहीत, आम्ही काही आदिवासींशी संपर्कात होतो. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे फळ झाडावरच राहण्याची चिन्हे आहेत, अशी प्रतिक्रिया काही व्यापारी मंडळींनी व्यक्त केली.
जांभळात औषधी गुण आहेत. त्यामुळे त्याला मोठी मागणी असते. मात्र, मोजकेच जांभूळ विक्रेते सध्या शहरात दिसत आहेत. त्यामुळे आंब्याच्या किमतीत जांभळे विकत घेण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया काही ग्राहकांनी व्यक्त केली.याशिवाय वाहतुकीची साधने नसल्याने करवंदे गोळा करून विक्री करायची कुठे, असा सवाल आदिवासी उपस्थित करत आहेत. त्यामुळे बाजारात करवंदेही आलेली नाहीत. आंबा, चिकू या फळांप्रमाणे जांभूळ आणि करवंद यांना कधीही मोठय़ा बाजारांत मानाचे स्थान मिळाले नाही. जांभूळ खरेदी-विक्रीत व्यावसायिकता नसल्याने गरजेपुरती खरेदी आणि विक्री या फळांबाबत होताना दिसत आहे. त्यातही व्यावसायिकदृष्टय़ा फळांची लागवडही होत नसल्याने त्याची साठवण आणि प्रक्रिया केंद्रेही उभी राहू शकलेली नाहीत. यामुळे अनेक आदिवासींच्या पारंपारिक व्यवसायावर गदा आली आहे. हक्काची कमाई बंद झाल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती मिळत आहे.